महारेशिम अभियान 2023 रेशिम शेतीसाठी शेतक-यांनी अनुदानाचा लाभ घ्यावा

यवतमाळ, दि. 23 नोव्हेंबर(जिमाका):- तुती लागवडीद्वारे रेशीम कोष उत्पादन ही योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राबविण्यात येते. जिल्ह्यात महारेशीम अभियान 2023 अंतर्गत तुती, टसर क्षेत्र नोंदणी कार्यक्रम 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर 2022 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. शेतक-यांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. लाभार्थी निवडीचे निकष अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती (Nomadic Tribes), भटक्याविमुक्त जमाती (Denotified Tribes), दारिद्र्य रेषेखालील कुटुंबे, महिलाप्रधान कुटुंबे, शारीरिक अपंगत्व प्रधान कुटुंबे. भूसुधार योजनेचे लाभार्थी, इंदिराआवास योजनेचे लाभार्थी, अनुसूचित जमातीचे व अन्य परंपरागत वन्यनिवास (वन अधिकारी मान्यता) अधिनियम 2006 नुसार पात्र व्यक्ती, कृषी माफी योजना सन 2008 नुसार अल्पभूधारक (एक हेक्टर पेक्षा जास्त दोन हेक्टरपर्यंत) व सीमांत शेतकरी (एक हेक्टर पेक्षा कमी क्षेत्र) क्षेत्र मर्यादा प्रति लाभार्थी एक एकर राहिल. या योजनेअंतर्गत रेशीम विकास प्रकल्पासाठी तीन वर्षांमध्ये अकुशल व कुशल (सामूग्री) मजुरी देण्यात येते. त्याचा तपशिल असा आहे. तुती लागवड व जोपासना - 2 लाख 36 हजार 322 रुपये, कीटक संगोपन गृह - 1 लाख 3 हजार 578 रुपये, फलक 3 हजार रुपये असे एकूण 3 लाख 42 हजार 900 रुपये अनुदान दिले जाते. तसेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा)अंतर्गत तुती रोपवाटिका, तुती लागवड, कीटक संगोपन गृह व संगोपन साहित्य खरेदीसाठी अनुदान दिले जाते. लाभार्थी निवडीचे निकष इच्छुक लाभार्थीकडे मध्यम ते भारी व पाण्याचा निचरा होणारी जमीन असावी. लागवड केलेल्या तुती क्षेत्रासाठी सिंचनाची पुरेशी सोय उपलब्ध असणे आवश्यक आहे. रेशीम उद्योगासाठी कुटुंबांमध्ये किमान एक व्यक्ती तूती लागवड व संगोपनासाठी उपलब्ध असावी. अनुसूचित जाती /अनुसूचित जमाती / महिला / दिव्यांग व इतर शेतकरी या योजनेसाठी पात्र आहे. *नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना अर्थसहाय्य तपशील* तुती रोपे तयार करण्यासाठी प्रती एकर सर्वसाधारण (७५ टक्के) १लाख १२ हजार ५०० अनु जाती, जमाती(९० टक्के) १ लाख ३५ हजार रुपये, तुती लागवड विकास कार्यक्रमाकरिता सहाय्य प्रती एकर सर्वसाधारण (७५ टक्के) ३७ हजार ५००, अनुसूचित जाती /जमाती(९० टक्के) ४५ हजार रुपये, दर्जेदार कोष उत्पादनासाठी- कीटक संगोपन साहित्य / शेती अवजारे साहित्य पुरवठासहाय्य आधुनिक माउंटेज (Rotary Mountages) सहित, प्रति लाभार्थी, सर्वसाधारण (७५ टक्के) ५६ हजार २५०, अनुसूचित जाती /जमाती (९०टक्के) ६७ हजार ५००, कीटक संगोपन गृह बांधणीसाठी सहाय्य प्रति लाभार्थी १ हजार चौ फुटासाठी सर्वसाधारण (७५ टक्के) १ लाख २६ हजार ४७९ अनुसूचित जाती /जमाती (९०टक्के) १ लाख ५१ हजार ७७५ रुपये. मॉडेल २ (६००चौ. फूट), सर्वसाधारण (७५ टक्के) ७१ हजार ३९७, अनुसूचितजाती / जमाती (९० टक्के) ८५ हजार ६७७ रुपये आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रेशीमशेती उद्योग वाढीसाठी वाव असून या योजने चालाभ घेण्यासाठी बारमाही सिंचनाची सोय व आधी खर्च करण्याची तयारी असलेल्या शेतकऱ्यांनी जिल्हा रेशीम कार्यालय, प्रशासकीय इमारत पहिला माळा, जिल्हाधिकारी कार्यालय, परिसर येथे अर्ज करावा असे आवाहन जिल्हा रेशीम अधिकारी व्ही. एस. शिंदे, यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी