महावितरणच्या कामावार पालकमंत्री यांची नाराजी नादुरुस्त रोहित्र तात्काळ दुरुस्त करुन जोडण्याचे आदेश यवतमाळ, दि २५ नोव्हेंबर, जिमाका:- सद्यस्थितीत रब्बी हंगामाला शेतकऱ्यांना सिंचनासाठी विजेची गरज लक्षात घेता नादुरुस्त असलेले रोहित्र तात्काळ दुरुस्त करून तीन दिवसाच्या आत जोडणी करण्यात यावी आणि शेतकऱ्यांना वीज उपलब्ध करून देण्यात यावी, अशा सूचना पालकमंत्री संजय राठोड यांनी दिल्यात. पालकमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली वीज वितरण विभागाच्या अडचणी संदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला आमदार सर्वश्री मदन येरावार, नामदेवराव ससाने संजय रेड्डी, डॉक्टर संदीप धुर्वे, प्रा. अशोक उईके, ईंद्रनील नाईक, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, महावितरणच्या मुख्य अभियंता श्रीमती चव्हाण, अधीक्षक अभियंता सुरेश मडावी तसेच दुरदृष्य प्रणालीद्वारे महावितरणचे संचालक संजय ताकसांडे हे मुंबईतून उपस्थित होते. शेतकऱ्यांकडून सातत्याने होत असलेल्या तक्रारीबाबत आणि महावितरणच्या एकंदरीत कामकाजाबाबत आज पालकमंत्री यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. जिल्ह्याचे वनक्षेत्र बघता शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासंदर्भात या जिल्ह्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले. कृषी पंपाच्या प्रलंबित जोडण्या निकाली काढण्यासाठी महावितरणने तात्काळ निविदा प्रक्रिया करून कृषी पंपाच्या जोडणी करून द्याव्यात. शेतकऱ्यांचे रोहित्र गतीने दुरुस्ती व्हावी यासाठी काही ट्रान्सफॉर्मर राखीव ठेवण्यासाठी जिल्हा नियोजन मधून निधी उपलब्ध करून देण्यात येईल, रोहित्र खरेदीची प्रक्रिया तात्काळ राबविण्यात यावी अशा सुचनाश्री राठोड यांनी केल्यात. तसेच रोहित्र दुरुस्तीसाठी 20 के. एल. ऑईल उपलब्ध करून देण्यात येईल असे संजय ताकसांडे यांनी सांगितले. शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी आणि विजेची गरज असते. त्यामुळे रोहित्र नादुरुस्त असल्यास किंवा वीज पुरवठा खंडित झाल्यास शेतकरी आपल्याला फोन करतात. ते त्रस्त असतात म्हणुन आपल्याला फोन करतात. त्यामुळे अधिकारी ,कर्मचारी यांनी शेतकऱ्यांशी सौजन्याने बोला, त्यांना व्यवस्थित समजावून सांगा त्यांची परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना सौजण्याची वागणूक द्या, अशा सूचना यावेळी पालकमंत्री यांनी दिल्यात.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी