संविधान दिनी विविध स्पर्धांचे आयोजन करण्याच्या जिल्हाधिकारी यांच्या सूचना जिल्ह्यात सर्वत्र उद्देशिकेचे होणार वाचन

यवतमाळ, दि २३ नोव्हेंबर, जिमाका:- भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा आणि सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास,श्रध्दा व उपासना यांचे स्वांतत्र्य, दर्जाची व संधीची समानता प्राप्त करुन देणारे भारतीय संविधान 26 नोव्हेंबर, 1949 रोजी देशाला अर्पण करण्यात आले. आपल्या संविधानाबाबत जनतेमध्ये जागृती निर्माण करण्याच्या दृष्टिने दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयामध्ये भारताचे संविधान या विषयावर प्रश्नमंजुषा, बहुपर्यायी प्रश्नांची परीक्षा व विविध स्पर्धांचे आयोजन व उद्देशिकेचे वाचन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या आहेत. संविधानाचा स्वीकार करुन 71 वर्ष पूर्ण झाली आहेत. जगभरातील संविधान बारकाईने वाचल्यानंतर, त्यांचा अभ्यास केल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि मसुदा समितिने भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला होता. त्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 रोजी तो भारतीय संविधान सभेसमोर मांडला. 26 जानेवारीपासुन या संविधानानुसार प्रजसत्ताक पद्धती आपण लागू केली. 19 नोव्हेंबर 2015 रोजी केंद्रीय सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाने नागरिकांमध्ये संविधानाच्या मूल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी 26 नोव्हेंबरला 'संविधान दिवस' साजरा करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासुन देशात 26 नोव्हेंबरला संविधान दिन साजरा करण्यात येत आहे. शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी, शासकीय, खाजगी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांना भारतीय संविधान, संविधानाने सर्वांना दिलेले अधिकार व त्यासोबत आपली कर्तव्ये ई. माहिती असणे आवश्यक आहे. त्यासाठी 26 नोव्हेंबरला जिल्हयातील सर्व शाळा (जिल्हा परिषद, नगर परिषद, सर्व आश्रमशाळा, खाजगी सर्व माध्यमाच्या शाळा), सर्व महाविद्यालयांमध्ये शाळेच्या पहिल्या तासामध्ये भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे (Preamble) सर्व विद्यार्थ्यांचे सामूहिक वाचन घेण्यात यावे. तसेच सर्व विद्यार्थ्यांकडून त्यांच्या हस्ताक्षरात भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेचे लेखन करुन घेण्यात यावे. शिक्षकांनी वर्गामध्ये विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाबाबत माहिती दयावी अशा सुचना जिल्हाधिकारी यांनी एका आदेशाद्वारे दिल्या आहेत. शासकीय कार्यालयांना 26 नोव्हेंबरला सार्वजनिक सुट्टी असल्याने 25नोव्हेंबरला सायंकाळी 5 वाजता उद्देशिकेचे वाचन करावे. तसेच सर्व माध्यमिक शाळा व महाविद्यालयांमध्ये भारताचे संविधान या विषयावर प्रश्नमंजुषा, बहुपर्यायी प्रश्नांची परीक्षा ई. उपक्रमही घेण्यात यावे. विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाचीमाहिती व ओळख सोबत अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी यासाठी विविध उपक्रम घेण्यात सुचना श्री येडगे यांनी दिल्यात. सदर उपक्रमाचे उत्कृष्ट आयोजन करणा-या कार्यालये, शाळा व महाविद्यालयांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचे त्यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी