शैक्षणिक गुणवत्तेत कमी असणा-या देशातिल १० जिल्ह्यात २२ नोव्हेंबरला मध्यावधी उपलब्धी सर्वेक्षण *परीक्षा पारदर्शकपणे पार पाडण्याच्या जिल्हाधिकारी यांच्या सूचना *विद्यार्थ्यांचा सराव करून घ्यावा *९४ शाळांमध्ये परीक्षा *१२३ नियंत्रण अधिकारी व क्षेत्र अन्वेषक म्हणून ११२ अधिकाऱ्यांची नियुक्ती

यवतमाळ, दि ११ नोव्हेंबर जिमाका:- शैक्षणिक गुणवत्तेत कमी असणा-या देशातिल १० जिल्ह्यात २२ नोव्हेंबरला विद्यार्थ्यांची शैक्षणिक पातळी तपासण्यासाठी मध्यावधी उपलब्धी सर्वेक्षण (मीड टर्म अचीवमेंट सर्वे) घेण्यात येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांचा सराव करून घ्यावा अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्यात. भारत सरकारने 2017 मध्ये देशातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता तपासण्यासाठी 2017 मध्ये राष्ट्रीय उपलब्धी सर्वेक्षण (नॅशनल अचीवमेंट सर्वे) घेतला होता. यामध्ये देशात १० जिल्हे हे कमी शैक्षणिक गुणवत्ता असलेले आणि 300 गुणांपेक्षा कमी गुण असलेले आढळुन आले. यात यवतमाळ जिल्ह्याला २९९ गुण मिळाले होते. त्यानंतर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान समितीने 2020 मध्ये कमी गुणवत्ता आढळून आलेल्या या १० जिल्ह्यांमध्ये तात्काळ शैक्षणिक उपक्रम राबवण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार भारत सरकारने मार्च 2022 मध्ये या जिल्ह्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी कार्यक्रम जाहीर केला. त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारने सुद्धा 27 ऑक्टोबर 2021 ला 'निपुण भारत' हा कार्यक्रम शालेय शिक्षण विभागांतर्गत राबवायला सुरुवात केली. मार्च 2022 ते मार्च 2023 या कालावधीत यवतमाळ जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत काही वाढ झाली की नाही हे तपासण्यासाठी भारत सरकारच्या राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदे (एनसीआरटी) मार्फत मध्यावधी उपलब्धी सर्वेक्षण अंतर्गत 22 नोव्हेंबरला परीक्षा घेण्यात येणार आहे. इयत्ता ३ री व ५ वी या इयत्तांची राष्ट्रीय संपादणूक पातळी तपासण्या करीता ही परीक्षा घेण्यात येत आहे. यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने जिल्ह्यातील ९४ शाळांची निवड केली आहे. या परीक्षेसाठी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदे कडुनच प्रश्नपत्रिका येणार आहे. या परीक्षेच्या तयारीसाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, डायटचे प्राचार्य डॉ.प्रशांत गावंडे, शिक्षणाधिकारी(प्राथ) यवतमाळ, श्री प्रमोद सूर्यवंशी तसेच सर्व गटशिक्षणाधिकारी, सर्व विस्तार अधिकारी, न.प. प्रशासन अधिकारी, प्रकल्प अधिकारी व समाजकल्याण अधिकारी उपस्थित होते. सदर परीक्षा पारदर्शक पध्दतीने पार पाडण्यासाठी मागदर्शन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी परीक्षेच्या अनुषंगाने सर्व जिल्हा परिषद, नगर परिषद,आश्रम शाळा आणि खाजगी आस्थपनांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे प्रश्नपत्रिकेचा सराव करुन घ्यावा, शंभर टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती राहील याची नोंद घ्यावी. १० नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबरपर्यंत कोणीही शिक्षक शाळेत गैरहजर राहता कामा नये. १८ व १९ नोव्हेंबरला विशेष सराव चाचणी घेण्यात यावी अशा सुचना केल्यात. दरम्यान या परिक्षेच्या संदर्भात प्रत्येक तालुक्यातील ४ शाळांचा पूर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकारी घेणार आहेत. परीक्षा पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी शिक्षण विभागाचा सहभागात घेण्यात आलेला नाही. 94 शाळांमध्ये परीक्षा घेण्यासाठी मुख्य नियंत्रक अधिकारी म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण प्रशांत थोरात यांचे नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच प्रश्नपत्रिका शाळेत पोहोचविण्यासाठी 123 नियंत्रण अधिकारी नेमले आहेत. त्याचबरोबर क्षेत्र अन्वेषक म्हणून 112 अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी