जिल्ह्यातील सर्व न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे 9 डिसेंबरला आयोजन

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ व जिल्हा वकील संघ, यवतमाळ यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालय, यवतमाळ येथे तसेच यवतमाळ जिल्हयातील सर्व तालुका न्यायालये, कामगार न्यायालय व औद्योगिक न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, ग्राहक तकार निवारण मंच आणि इतर सर्व न्यायालये तसेच न्यायाधिकरणे येथे 9 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आलेले आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष एस.व्ही. हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली या लोकअदालतचे आयोजन करण्यात आलेले आहे. या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेले तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, भुअर्जन मामल्याची प्रकरणे, महसुली प्रकरणे, वैवाहिक संबंधातील वाद प्रकरणे, बँका व अन्य वित्तीय संस्थांचे नुकसान व वसुली प्रकरणे व तडजोडीस पात्र असणारी सर्व प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली निघणार आहे. या लोकअदालतीमध्ये वाद मिटविण्याकरीता न्यायाधीश, तज्ज्ञ वकील व सामाजिक कार्यकर्ते यांचे मंडळ पक्षकारांस मदत करेल. तसेच लोकअदालतीमध्ये प्रकरण ठेवण्यासाठी कोणत्याही प्रकारची फी भरावी लागणार नाही व लोकअदालतीचे निवाड्याविरूध्द अपील नसल्याने वाद कायमचा मिटतो. न्यायालयाच्या हुकुमनाम्याप्रमाणे लोकअदालतीमध्ये होणाऱ्या निवाड्याची अंमलबजावणी न्यायालयामार्फत करता येते. खटल्यांमध्ये साक्षी पुरावा, उलट तपासणी, दिर्घ युक्तीवाद याबाबी टाळल्या जातात. याप्रमाणे लोकअदालतीमध्ये वाद मिटविल्याने वेळेची व पैशाची बचत होते. तसेच प्रकरण न्यायालयात चालविण्यासाठी होणाऱ्या त्रासातून सुटका होते व त्वरित आपसी संमतीने न्याय मिळतो. पक्षकारांनी आपली प्रकरणे 9 डिसेंबर रोजी आयोजित राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ठेवण्याकरीता प्रलंबित प्रकरणांसाठी संबंधित न्यायालयात अर्ज सादर करावा आणि दाखलपूर्व प्रकरणांसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ तसेच यवतमाळ जिल्ह्यातील इतर तालुका विधी सेवा समितीच्या कार्यालयाशी संपर्क साधून जास्तीत जास्त प्रकरणे ठेवून आपसी तडजोडीने मिटवावीत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव के.ए. नहार आणि जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष संजय टी. जैन यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी