पशुसंवर्धन विभागांतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

8 डिसेंबरपर्यंत मुदत : ग्रामीण भागातील पशुपालक, सुशिक्षित बेरोजगार युवक, महिला, शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन विभागाने केले आहे. नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेंतर्गत दुधाळ गाई- म्हशीचे गट वाटप करणे, शेळी-मेंढी गट वाटप करणे, एक हजार मांसल कुक्कुट पक्षांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे, 100 कुक्कुट पिलांचे वाटप व 25+3 तलंगा गट वाटप या योजनासाठी ऑनलाईन पध्दतीने लाभार्थी निवड प्रक्रिया या वर्षात राबविली जाणार आहे. डेअरी, पोल्ट्री किंवा शेळीपालन यापैकी ज्या बाबींमध्ये अर्ज करावयाचा आहे त्याची निवड करण्यची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्यातील पशुपालक, शेतकरी बांधव, सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती व महिलांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज दाखल करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी पशुसंवर्धन विभागाचे एएच-महाबीएमएस हे संकेतस्थळ उपलब्ध करण्यात आले आहे. अर्ज करण्याची मुदत ही 8 डिसेंबरपर्यंत देण्यात आली आहे. तसेच मदतीसाठी टोल फ्री क्रमांक 18002330418 उपलब्ध करुन देण्यात आला आहे. पशुसंवर्धन विभागाच्यावतीने वैयक्तिक लाभच्या योजनांतर्गत प्रक्रिया अधिक पारदर्शक करणेसाठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनेमध्ये गेली चार वर्षे ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविणे व लाभार्थी निवड करण्याची पध्दत सुरू करण्यात आली आहे. सन २०२१-२२ पासून जिल्हास्तरीय विविध योजनांसाठी सुद्धा ही संगणक प्रणाली लागू करण्यात आली आहे. यामध्ये एखाद्या योजनेकरिता अर्ज केल्यानंतर त्यास दरवर्षी पुन्हा अर्ज करावे लागू नये यासाठी तयार केलेली प्रतिक्षायादी सन २०२१-२२ पासून पुढील पाच वर्षापर्यंत लागू ठेवण्याची सोय शासनाने केली आहे. त्यामुळे अर्ज केलेल्या पशुपालकांना लाभ मिळण्याची शक्यता वाढली असून, त्याची प्रतिक्षा यादीतील क्रमांकानुसार अंदाजे केव्हा लाभ मिळेल हे कळु शकल्यामुळे लाभार्थी हिस्सा भरणे किंवा इतर बाबींकरिता नियोजन करता येणे शक्य होणार आहे. योजनांची संपूर्ण माहिती तसेच अर्ज करण्याची पध्दती याबाबतचा संपूर्ण तपशील या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीनेच स्विकारले जातील. या संगणकप्रणालीमध्ये अर्ज भरणे अत्यंत सुलभ करण्यात आले असून, अर्जामधील माहिती कमीत कमी टाईप करावी लागेल आणि बहुतांशी माहितीबाबत पर्याय निवडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्ज भरताना अर्जदाराने नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठविण्यात येणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत अर्जदाराने योजनेंतर्गत आपला मोबाईल क्रमांक बदलू नये व मागिल वर्षी अर्ज केलेल्या अर्जदारांनी पुन्हा अर्ज करावयाची आवश्यकता नाही. योजनेबाबत अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांकावर किंवा तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अथवा उपआयुक्त कार्यालय, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात येत आहे. 000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी