पशुधनातील वंधत्वावर उपाययोजनांसाठी जिल्ह्यात पशुवंधत्व निवारण अभियान गावागावांत शिबिरांचे आयोजन ; पशुस्वास्थसंबंधी पशुपालकांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन

राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभाग आणि जिल्हास्तर विभागाच्या वतीने यवतमाळ जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये पशुवंधत्व निवारण अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत 30 नोव्हेंबर पासून जिल्ह्यातील पशुवैद्यकीय संस्थांतर्गत पशुंमधील वंधत्व निवारणासाठी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या ३० नोव्हेंबर ते १९ डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या अभियानाचा मुळ उद्देश हा जिल्ह्यातील वंधत्वामुळे दूध उत्पादनात नसलेल्या भाकड जनावरांमधील वंधत्वावर उपाययोजना करुन जनावरे गाभण राहतील व पुढे त्यांच्यापासून दुध उत्पादनात वाढ करणे हा आहे. सर्वसाधारणपणे बहुतांश जनावरांचे शारीरिक वजन कमी असल्याने व शारीरिक वजनवाढ आणि पशुप्रजननाचा थेट संबंध असल्याने पशुपालकांना जनावराचे शारीरिक वजन योग्य प्रमाणात रहावे याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच जंतुनिर्मूलन, जनावरांना योग्य संतुलित आहार कशाप्रकारे द्यावा, गायी म्हशींचे प्रजनन, माजाचे चक्र, माज लक्षणे, म्हशींमधील मुका माज, कृत्रिम रेतन तंत्र, गर्भ तपासणी, वंधत्व निवारण, वैरण विकास कार्यक्रम व पशुस्वास्थ इत्यादी बाबतीतही मार्गदर्शन केले जाणार आहे. या अभियानादरम्यान जिल्ह्यातील बहुतांश शिबिरांमध्ये जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, पशुवैद्यकिय महाविद्यालयातील पशुप्रजनन विषयातील तज्ज्ञ, पशुसंवर्धन विभागातील पशुप्रजनन क्षेत्रात पदव्युत्तर तसेच डॉक्टरेट अभ्यासक्रम पूर्ण केलेले अधिकारी, पशुधन विकास अधिकारी हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. शिबिरांबाबत पशुपालकांना माहिती द्यावी पशुवंधत्व निवारण शिबिरांबाबत 29 नोव्हेंबर पर्यंत जिल्ह्यातील सर्व सरपंच, ग्रामसेवक, प्रशासक यांनी कार्यक्षेत्रातील गावांमध्ये प्रचार, प्रसिध्दी, दंवडी देवून पशुपालकांना माहिती द्यावी. जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी शिबिराचा लाभ घेवून गायी म्हशीमंधील वंधत्व दूर करण्यासाठी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी कार्यालय यांनी केले आहे

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी