रेशीम उद्योग वाढीसाठी महारेशीम अभियान राबविण्यात येणार

रेशीम शेतीचे महत्व व त्यातून मिळणाऱ्या हमखास व शाश्वत उत्पन्नाची शेतकऱ्यांना माहिती व्हावी यासाठी तसेच आगामी वर्षात तुती लागवड रेशीम लाभार्थीची नाव नोंदणी करण्यासाठी २० नोव्हेंबर ते २० डिसेंबर या कालावधीत राज्यात महारेशीम अभियान राबवण्यात येणार आहे. गतवर्षी यवतमाळ जिल्ह्यात ५७५ शेतकऱ्यांनी ६४० एकर क्षेत्रामध्ये तुती लागवड केली असून यात वाढ होण्यासाठी अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जाणार आहे. कृषी आणि वन संपत्तीवर आधारित रोजगाराची प्रचंड क्षमता असलेला रेशीम उद्योग असून महाराष्ट्रातील हवामान याला पोषक आहे. कृषी विकास दरवृध्दीबरोबरच ग्रामीण भागातील जनतेचा अर्थिकस्तर व जीवनमान उंचावण्यास मदत करणारा रेशीम शेती हा उद्योग आहे. यातून हमखास व नियमित उत्पन्न मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कलही वाढत चालला आहे. हीच बाब लक्षात घेवून एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी आणण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत रेशीम उद्योग विकास योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत तुती लागवडीसाठी जवळपास दोन लाख १८ हजार रुपये तर संगोपनगृह बांधकामासाठी एक लाख ७९ हजार रुपये असे तीन वर्षासाठी जवळपास तीन लाख ९७ हजार रुपये अनुदान मिळणार आहे. सिल्क समग्र योजना रेशीम संचालनालयाच्यावतीने केंद्र पुरस्कृत सिल्क समग्र-२ ही योजनासुध्दा राबविण्यात येत आहे. या योजनेतून तुती लागवड, कीटक संगोपनगृह बांधकाम, कीटक संगोपन साहित्य, तुती रोप वाटिका, बाल कीटक संगोपन केंद्र, रेशीम कोषापासुन धागा तयार करण्यासाठी मल्टिएंड रिलींग मशीनसाठी सर्वसाधारण वर्गासाठी ७५ टक्के अनुदान आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी ९० टक्के अनुदान देण्यात येईल. अर्ज कोठे करावा ? ज्या शेतकऱ्यांना बारमाही सिंचनाची सोय उपलब्ध आहे, अशा शेतकऱ्यांनी रेशीम विकास अधिकारी, जिल्हा रेशीम कार्यालय, प्रशासकीय भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ ग्रामपंचायत कार्यालय, तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी पं.सं. व गटविकास अधिकारी, नरेगा कार्यालय, पंचायत समिती येथे अर्ज सादर करावे. रेशीम उद्योग का करावा? इतर बागायती पिकाच्या तुलनेत एकदा तुती लागवड केल्यावर १५ ते १७ वर्षापर्यंत लागवडीवर खर्च करण्याची गरज नाही. इतर पिकाच्या तुलनेत रासायनिक फवारणीची गरज नाही. जंगली जनावरांचा या पिकास धोका नाही. नैसर्गिक आपत्तीपासून नुकसान नाही. चोराची भिती नाही. घरातील वृध्द, स्त्री, पुरुष,मुले यांचा सहभाग वाढतो. कोष विक्रीबाबत मार्केट व्यवस्था उपलब्ध होते. मार्केटचे तुलनात्मक दर ऑनलाईन पाहू शकतो. अल्प कालावधीतील पिक, उत्तम जोडधंदा होतो. तुतीच्या फांद्या व कीटकांच्या विष्टापासून सेंद्रीय खत उपलब्ध होते. महिलांचा ५० ते ६० टक्के सहभाग. इतर पिकाच्या तुलनेत पाणी कमी लागते. तुतीचा पाला दुभत्या जनावरांना खाद्यासाठी उपलब्ध होतो. नवीन तुती लागवडीसाठी इच्छुकांनी नाव नोंदणी करावी. सभासदत्व प्राप्त करुन आपले उत्पन्न दुप्पट करा, असे आवाहन रेशीम विकास अधिकारी यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी