जिल्हा बाल संरक्षण कक्षाला बाल स्नेही पुरस्कार बाल संरक्षण क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरीबद्दल गौरव

बाल संरक्षण क्षेत्रात राज्यात उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल यवतमाळच्या जिल्हा बाल संरक्षण कक्षाला ‘बाल स्नेही पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, महिला व बाल विकास विभाग, युनिसेफ, कम्युटेड कम्युनिटीज डेव्हलपमेंट ट्रस्ट (सीसीडीटी) व होप फॉर चिल्ड्रन इंडिया, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी दि. 22 नोव्हेंबर रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात ‘बाल स्नेही पुरस्कार 2023’ सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा पुरस्कार सोहळा राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष अॅड सुशीबेन शहा, महिला व बाल विकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, आयोगाचे सचिव शिवराज पाटील, विशेष पोलिस महानिरीक्षक (महिला व अत्याचार) दीपक पांडे, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य सचिव शिवराज पाटील, बचपन बचाव आंदोलनाच्या संचालक संपर्ण बेहरा, युनिसेफच्या मुख्य अधिकारी राजलक्ष्मी नायर, होप फोर चिल्ड्रन इंडियाच्या कॅरोलिनी व्हॅल्टन, महिला व बालविकास उपायुक्त राहुल मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी बाल संरक्षण क्षेत्रातील सर्व नामांकित संस्था व व्यक्तींची उपस्थिती होती. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रशांत थोरात यांच्या मार्गदर्शनात व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजुरकर यांच्या नेतृत्वात यवतमाळ जिल्हा बाल संरक्षण कक्षाने केलेल्या बाल संरक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्यातील उत्कृष्ठ जिल्हा बाल संरक्षण कक्ष हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करून गौरविण्यात आले. या सोहळ्यासाठी संरक्षण अधिकारी देवेंद्र राजुरकर, अविनाश पिसुर्डे, माधुरी पावडे, विधी व परिविक्षा अधिकारी महेश हळदे यांनी हा पुरस्कार स्विकारला. राज्यात बालकांचा सर्वांगीण विकास, बाल हक्क संरक्षण, सुरक्षा, आरोग्य इत्यादी अनेक महत्त्वपूर्ण विषयावर जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, विशेष बाल पोलीस पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचारी, बालगृह, बाल कल्याण समिती इत्यादी प्रशासकीय यंत्रणा व संस्था या सकारात्मक पद्धतीने मोलाचे कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना बाल स्नेही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राज्यात अशाप्रकारे बालकांसाठी काम करणाऱ्या सर्व यंत्रणांकरिता बाल स्नेही पुरस्कार सोहळ्याचे प्रथमच आयोजन करण्यात आले. बालस्नेही पुरस्कार गौरविल्याबाबत जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सर्व स्तरावरुन कौतुक केले जात आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी