शेतकऱ्यांनी वैयक्त‍िक शेततळ्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा-जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांचे आवाहन

Ø मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना : Ø 23 ते 75 हजार रुपयांपर्यंतचे अनुदान : राज्याच्या कृषि विभागामार्फत मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेअंतर्गत वैयक्त‍िक शेततळे ही योजना गत वर्षापासून राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत शेततळ्यासाठी 75 हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येते. जिल्ह्यातील इच्छुक शेतकऱ्यांनी वैयक्त‍िक शेततळ्यासाठी महाडीबीटी या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे यांनी केले आहे. जिल्ह्यातील बहुतांश शेती ही पावसावर अवलंबून असलेली कोरडवाहू शेती आहे. जिल्ह्यातील विविध भागातील पावसाचे असमान वितरण आणि पावसातील अनिश्चित येणारे खंड याप्रमुख नैसर्गिक आपत्ती आहेत. यामुळे सिंचनाअभावी पीक उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येते. ज्याठिकाणी पाण्याचा जास्त तान पडतो तेथील पिके देखील नष्ट होतात, पर्यायाने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. जेव्हा मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो तेव्हा ओढे, नाले, नदी इत्यादीद्वारे वाहून जाणारे अतिरिक्त अपधाव उपसून त्याची साठवणूक करण्यासाठी शेतात शेततळ्यासारखी पायाभूत सुविधा उभी करण्यास चालना देणे हा यावरील उपाय आहे. तसेच संरक्षित ओलीताची सोय असल्यास उत्पन्नात भर पडेल. जिल्ह्यात पर्जन्य आधारित शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी राज्य शासन शेततळे योजना अनुदानावर राबवित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन व उत्पन्नात वाढ होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. मुख्यमंत्री शाश्वत कृषि योजनेअंतर्गत वैयक्त‍िक शेततळे या घटकासाठी 15 X 15 X 3 मीटर ते 34 x 34 x 3 मीटर या आकारमानातील शेततळ्याचा समावेश करण्यात आलेला आहे. तसेच शेततळ्याच्या आकारमानानुसार किमान 23 हजार 882 रुपये ते कमाल 75 हजार रुपयांपर्यंत अनुदान देय आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी वैयक्त‍िक शेततळ्याचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे यांनी केले आहे. लाभार्थी पात्रता : 1. अर्जदार शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर किमान 0.40 हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक आहे, क्षेत्र धारणेस कमाल मर्यादा नाही. 2. अर्जदाराने यापूर्वी मागेल त्याला शेततळे, सामुहीक शेततळे अथवा भात खाचरातील घोडो किंवा इतर कुठल्याही शासकिय योजनेतुन शेततळे या घटकाकरीता शासनाच्या अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा. इच्छुक शेतकऱ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा व काही अडचणी उद्भवल्यास गावातील कृषि सहायक किंवा तालुका कृषि अधिकारी, कार्यालय येथे भेट देऊन सल्ला घ्यावा, असे अवाहन कृषि विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी