शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगाम पीकस्पर्धा

राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यामध्ये वाढ होईल. या उद्देशाने राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. वंचित व दुर्लक्षित तसेच पौष्टिक तृणधान्य पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादन तंत्रज्ञानात वाढ होण्याची आवश्यकता विचारात घेऊन तसेच जास्तीत जास्त शेतकरी पीक स्पर्धांमध्ये सहभागी होतील, या दृष्टीकोनातून रब्बी हंगाम पीकस्पर्धा तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर राबविण्यात येत आहे. त्यानुसार कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम सन 2023 मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस या 5 पिकांसाठी पीकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पीकस्पर्धेतील पीके : रब्बी पीके-ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस. पात्रता व निकष: स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे स्वतःच्या नावे जमीन असणे व ती जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत भाग घेता येईल. पिकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थ्याच्या स्वतःच्या शेतावर त्या पिकाखाली किमान 40 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे : विहित नमुन्यातील अर्ज प्रपत्र-अ ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, 7/12, 8-अ चा उतारा, जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास) पीक स्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित 7/12 वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा, बँक खाते चेक, पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत आवश्यक आहे. रब्बी हंगामामध्ये पीक स्पर्धेची अर्ज दाखल करण्याची तारीख दि. 31 डिसेंबर ही आहे. तालुकास्तर व जिल्हास्तरावरील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पीक स्पर्धा विजेते निवडण्यात येतील. स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी पीकनिहाय रक्कम 300 रुपये राहील व आदिवासी गटासाठी रक्कम 150 रुपये राहील. बक्षिसाचे स्वरुप : स्पर्धा पातळी सर्वसाधारण व आदिवासी गट बक्षिसाठी तालुका पातळी - प्रथम पुरस्कार 5 हजार रुपये, द्वितीय 3 हजार रुपये व तृतीय 2 हजार रुपये, जिल्हा पातळी प्रथम 10 हजार, द्वितीय 7 हजार व तृतीय 5 हजार रुपये, राज्य पातळी प्रथम 50 हजार, द्वितीय 40 हजार व तृतीय 30 हजार रुपये आहे. दुय्यम तसेच पौष्टिक तृणधान्य पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ होणे आवश्यक आहे, ही बाब विचारात घेऊन पिकस्पर्धेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे व अधिक माहितीसाठी उपविभागीय कृषी अधिकारी किवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी