जिल्ह्यातील ५९ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रीम पीक विमा जमा

> शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा पालकमंत्री संजय राठोड यांचा प्रयत्न > ४१ कोटींची पीक विमा नुकसान भरपाई वितरित यवतमाळ, दि. 10 : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील ५९ हजार ४०४ शेतकऱ्यांच्या खात्यात ४१ कोटी ११ लाख रुपयांचा अग्रीम पीक विमा जमा करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनादिवाळीपूर्वी अग्रीम पीक विमा देवून शासनाने मोठा दिलासा दिला आहे. राज्यातील पीक विमा कंपन्यांनी पहिल्या टप्प्यात पीक विमा अग्रीम वितरण करण्यास मंजुरी दिली आहे. बहुतांश ठिकाणी दिवाळीपूर्वीच पीक विम्याची अग्रीम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले होते. यात यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी रक्कम मिळावी यासाठी पालकमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि कृषीमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या या पाठपुराव्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा अग्रीम रक्कम अदा करण्याची रिलायंस जनरल इन्शुरन्स कंपनीने मंजुरी दिली. पीक विमा नुकसान भरपाई रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर थेट वितरण करण्यास विमा कंपन्यांनी सुरुवात केली आहे. दिवाळीपूर्वी ही अग्रीम रक्कम मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप २०२३ अंतर्गत जिल्ह्यात ३ लाख ६६ हजार ९८९ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला असून शेतकऱ्यांच्या ८ लाख ४४ हजार ७५७ अर्जाची नोंदणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांनी एकूण ५ लाख २५ हजार ५४१ पीक विमा योजनेच्या स्थानिक आपत्ती जोखीमेअंतर्गत पूर्वसुचना नोंदविल्या आहेत. या प्राप्त पूर्वसुचनांचे पंचनामे करुन रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी या पीक विमा अंमलबजावणी कंपनीमार्फत जिल्ह्यातील ५९ हजार ४०४ शेतकऱ्यांना ४१ कोटी १0 लाख रुपये रकमेची विमा भरपाई रक्कम दि.८ व ९ नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. उर्वरित शेतकऱ्यांच्या पूर्वसुचनांची नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही विमा कंपनीच्या स्तरावरून सुरू असून उर्वरित शेतकऱ्यांना देखील लवकरच विमा कंपनीमार्फत लाभाचे वितरण होणार आहे, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाने दिली आहे. ०००० --

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी