शेतकऱ्यांनी कापूस न विकता कापसाच्या गठाणी करून विकावे - जयेश महाजन

शेतकऱ्यांनी कापूस थेट न विकता कापसाच्या गठाणी करून विकावे, असे प्रतिपादन नागपूर येथील महाकोटचे नोडल अधिकारी जयेश महाजन यांनी केले.
प्रकल्प संचालक, आत्मा यांच्यामार्फत जागतिक बँक अर्थसहाय्य‍ित बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत ‘उत्पादन तंत्रज्ञान व बाजार संमेलन - स्मार्ट कॉटन’ विषयावर जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन सेंट्रल सेलिब्रेशन हॉल येथे करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. महाकोटचे नोडल अधिकारी जयेश महाजन पुढे म्हणाले की, स्मार्ट प्रकल्प अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील चार तालुक्यातील 46 गावांमध्ये स्मार्ट कॉटन हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. यामध्ये शेतकरी गटांनी एक गाव एक वान या धर्तीवर एक जिन्सी स्वच्छ कापूस वेचणी करावी. साडेपाचशे क्विंटलचा एक लॉट तयार करून तालुक्यातील जिनिंग प्रेसिंग करून सरकी व रुई वेगळी करायची. यामधील रुईचे गटाने ई ऑक्शन प्रमाणे ज्यावेळेस गटाला विक्री करायची आहे व बाजारभाव चांगले आहेत अशा वेळेस विक्री करू शकतात. जेणेकरून शेतकऱ्याला जास्तीचा फायदा कसा मिळवून देता येईल सोबत घरात कापूस ठेवल्यापेक्षा वेअर हाऊसमध्ये गठाणी (बेल्स) ठेवल्यास त्यावर 70 टक्केप्रमाणे कर्जाची सोय सुद्धा उपलब्ध होणार आहे. म्हणून प्रत्येक गावामध्ये किमान 100 बेल्स तयार होतील या दृष्टीने नियोजन करण्याचे आवाहन त्यांनी केले. आत्माचे प्रकल्प संचालक संतोष डाबरे यांनी स्मार्ट कॉटन संदर्भामध्ये कापूस लागवडीपासून ते विक्रीपर्यंत काय काळजी घ्यावी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. अमरावती येथील गिअर्सचे गजानन जाधव यांनी जिनिंग प्रेसिंग करण्यासाठी लागणाऱ्या मशिनरी व इतर अनुषंगिक माहिती दिली. बँक ऑफ महाराष्ट्रचे शाखा व्यवस्थापक अकेला यांनी स्मार्ट प्रकल्प अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्यांना कर्ज उपलब्ध करण्याबाबत आश्वासन दिले. कॉटन कनेक्टचे शुभम ढोपे यांनी दर्जेदार कापूस कसा पिकवावा यासंदर्भात मार्गदर्शन केले. यवतमाळ येथील सागर फायबर्स टेक्स्टाईल जिनर्सचे गजानन कोल्हे यांनी शेतकऱ्यांनी कापूस वेचताना काय काळजी घ्यावी तसेच जिनिंग व प्रेसिंग करण्यासाठी कोणत्या दर्जाचा कापूस पाहिजे, त्याचे मापदंड, कापसाचे भाव या संदर्भामध्ये मार्गदर्शन केले. यावेळी शेतकरी, अधिकारी- कर्मचारी ,गट प्रमुख, ग्रेडर यांची गट चर्चा करण्यात आली आणि अस्तित्वातील मूल्य साखळीमधील असलेल्या अडचणीं जाणून घेण्यात आल्या. यामध्ये शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्मार्ट प्रकल्पाचे नोडल अधिकारी सतीश सांगळे यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून अग्रणी बँकेचे प्रमुख गजभिये. कार्यशाळेला चारही तालुक्यांचे कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, मल्टी टास्किंग ग्रेडर, गटप्रवर्तक, कृषी सहाय्यक, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक , शेतकरी, जिनिंग प्रेसिंग युनिटचे अधिकारी, सूक्ष्म सिंचन पुरवठादार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अर्थशास्त्रज्ञ ब्रह्मानंद चव्हाण यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी