जिल्ह्यात पाच ठिकाणी मोफत अंडवृध्दी शस्त्रक्रिया शिबीर रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन

समाजातील सर्व घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहचविण्यासाठी तसेच आरोग्याच्या सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी आयुष्मान भव मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील पाच रुग्णालयात मोफत अंडवृध्दी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. ही मोहीम 31 डिसेंबरपर्यंत राबविली जाणार आहे. आयुष्मान भारत मोहिमेंतर्गत आरोग्याशी संबंधित विविध योजनांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणुन राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम व हत्तीरोग दुरीकरणासाठी अंडवृध्दी शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन जिल्हा आरोग्य प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. यापूर्वी जिल्ह्यात 16 ते 31 ऑगस्ट दरम्यान हत्तीरोग व अंडवृध्दी मोहीम राबविण्यात आली होती. त्यात यवतमाळ तालुक्यात 5, कळंब 21, बाभुळगाव 7, दारव्हा 2, आर्णी 6, नेर 7, उमरखेड 1, राळेगाव 45, घाटंजी 14, पांढरकवडा 35, मारेगाव 36, झरी 48, व वणी 53 असे एकूण 280 अंडवृध्दी रुग्णांची नोंदणी झालेली आहे. या अंडवृध्दी रुग्णांची निःशुल्क शस्त्रक्रिया होण्याच्या दृष्ट‍िकोणातून जिल्ह्यात वंसतराव नाईक शासकीय वैद्यकिय महाविद्यालय यवतमाळ, उपजिल्हा रुग्णालय पांढरकवडा, ग्रामीण रुग्णालय वणी, उपजिल्हा रुग्णालय दारव्हा, तसेच ग्रामीण रुग्णालय उमरखेड अशा पाच ठिकाणी रुग्णांची मोफत अंडवृध्दी शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुखदेव राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी.एस. चव्हाण यांनी केले आहे. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकिय महाविद्यालय यवतमाळ येथे सुट्टीचा दिवस वगळून दररोज रुग्ण भरती आणि मंगळवारी शस्त्रक्रिया केली जाईल. उपजिल्हा रुग्णालय, दारव्हा येथे सोमवारी रुग्ण भरती आणि मंगळवारी शस्त्रक्रिया केली जाईल. ग्रामीण रुग्णालय, उमरखेड येथे सोमवारी रुग्ण भरती आणि मंगळवारी शस्त्रक्रिया केली जाईल. उपजिल्हा रुग्णालय, पांढरकवडा येथे बुधवारी रुग्ण भरती आणि गुरुवारी शस्त्रक्रिया केली जाईल. ग्रामीण रुग्णालय, वणी येथे गुरुवारी रुग्ण भरती व शुक्रवार शस्त्रक्रिया केली जाईल, असे नियोजन करण्यात आले आहे. चौकट हत्तीरोग हा कधीही बरा न होणारा आजार असल्यामुळे प्रतिबंध हा एकमेव उपाय आहे. अंडवृध्दीग्रस्त रुग्णांनी मनात कुठलीही भिती व गैरसमज न ठेवता जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याकडून तपासणी करुन घ्यावी. जिल्ह्यात डिसेंबर अखेर शंभर टक्के अंडवृध्दी रुग्णांनी शस्त्रक्रिया करुन जिल्हा आरोग्य प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. टि.ए.शेख यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी