जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व केंद्रीय विद्यालयाच्यावतीने बालक दिन उत्साहात साजरा बालकांना कायदेविषयक मार्गदर्शन

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय व केंद्रीय विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच बालक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त बालकांना कायदेविषयक मार्गदर्शनासाठी शिबिराचे आयोजनही करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशावरून व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.व्ही. हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश व.स्तर के.ए. नहार हे होते. तर प्रमुख म्हणून केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य किरण के. मेंढे, तसेच प्रमुख वक्ते म्हणून पॅनल वकील प्राची निलावार व ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्टच्या जिल्हा समुपदेशक माधुरी कोटेवार हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्ता पॅनल वकील प्राची निलावार यांनी बालकांच्या अधिकाराबाबत विस्तृत माहिती दिली. तसेच कुठल्याही देशाचे भवितव्य हे त्या देशातील बालकांवर अवलंबून असते. किंबहुना बालके ही देशाची अमुल्य व अपूर्व संपत्ती आहे. प्रत्येक जबाबदार नागरिकाने त्यांची योग्य काळजी घ्यावी, असे प्रतिपादन त्यांनी केले. तसेच बालकांचे हक्क व त्यांचे संरक्षण विषयावर मार्गदर्शन करताना बालकांना असलेल्या अधिकार जसे शिक्षणाचा, जगण्याचा, संरक्षणाचा व विकासाच्या अधिकाराबाबत विस्तृत माहिती दिली. जिल्हा समुपदेशक माधुरी कोटेवार यांनी बाल विवाह करणे हा कायद्याने गुन्हा असल्याचे सांगत दिवसेंदिवस होत असलेल्या बाल लैगिंक अत्याचाराबाबत मार्गदर्शन केले. बाल लैगिंक अत्याचार होवू नये याबाबत काय संरक्षण केले पाहिजे याबाबत काही मुलींना त्यांनी सल्ला दिला. अत्याचाराची घटना कुणासोबतही घडल्यास त्याबाबतची माहिती तात्काळ आपल्या शिक्षकांना किंवा आई वडीलांना द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष के.ए. नहार यांनी आपल्या मार्गदर्शनातून बालकांसोबत संवाद साधून त्यांना संविधान सोप्या भाषेत समजावून सांगितले. भारतात जे जन्माला येतात त्यांना संविधानाने अधिकार प्रदान केले आहेत. कोणताही बालक हा आपल्या अधिकारापासून वंचित राहता कामा नये, असे त्यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबतही त्यांनी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्रीय विद्यालयचे शिक्षक डॅा अलपना कौशिक यांनी केले तर आभारप्रदर्शन शिक्षक आशिष सोनोले यांनी केले. यावेळी केंद्रीय विद्यालयाचे शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी