मराठवाडा पॅकेजच्या धर्तीवर जिल्ह्यात शेळी, गाई व म्हशी गट वाटप सुरु १८ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत

महाराष्ट्र शासनाच्या पथदर्शी योजनेअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात यंदाच्या आर्थिक वर्षात ५० टक्के अनुदानावर सर्व प्रवर्गासाठी शेळी, गाई व म्हशी गट वाटप करण्यात येत आहे. जिल्ह्यातील इच्छुकांनी १८ डिसेंबरपर्यंत अर्ज संबंधित तालुका पशुधन विकास अधिकारी यांच्याकडे सादर करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त तथा निवड समिती अध्यक्षांनी केले आहे. या योजनेमध्ये १६.२ टक्के अनुसूचित जाती व जमातीचे आठ टक्के लाभार्थींची निवड होणार असून ३० टक्के महिला व ३ टक्के दिव्यांग लाभार्थीस प्राधान्य देण्यात येणार आहे. शेळी गट प्रकल्पात २० शेळ्यांसाठी मापदंड मर्यादा प्रती शेळी सहा हजार रुपये, एकूण किंमत मर्यादा एक लाख २० हजार रुपये, एका गटासाठी ५० टक्के म्हणजेच अनुदान ६० हजार रुपये, दोन बोकडांसाठी मापदंड मर्यादा प्रती बोकड ७ हजार रुपये एकूण किंमत मर्यादा १४ हजार रुपये, एका गटासाठी ५० टक्के म्हणजे ७ हजार रुपये अनुदान, शेळ्यांसाठी गोठा किंवा वाडा बांधकामासाठी मापदंड मर्यादा ४५० चौरस फुट प्रती चौरस फुट २१२ रुपये एकूण किंमत मर्यादा ९५ हजार ४०० रुपये, एका गटासाठी ५० टक्के म्हणजे ४७ हजार ७० अनुदान, एकूण किंमत मर्यादा २ लाख २९ हजार ४००, एका गटासाठी ५० टक्के अनुदान १ लाख १४ हजार ७०० देण्यात येते. दुधाळ प्रकल्पासाठी दोन देशी, दोन संकरीत गाईसाठी मापदंड मर्यादा खरेदी खर्च ५१ हजार रुपये प्रती गाय, परराज्यातून वाहतूक खर्च प्रती गाय पाच हजार रुपये, एकूण किंमत मर्यादा रुपये १ लाख १२ हजार, एका गटासाठी ५० टक्के म्हणजेच ५६ हजार रुपये अनुदान, दोन म्हशीसाठी मापदंडानुसार खरेदी खर्च ६१ हजार रुपये आणि परराज्यातून वाहतूक खर्च मर्यादा प्रती म्हैस पाच हजार रुपये, एकूण किंमत मर्यादा १ लाख ३२ हजार, एका गटासाठी ५० टक्के म्हणजेच ६६ हजार रुपये अनुदान देण्यात येते. या योजनेनुसार निवडलेल्या लाभार्थीने आधी स्वखर्चाने व बँक कर्ज उभारुन प्रकल्प स्थापित करायचा आहे. त्यानंतर लाभार्थीच्या बँक खात्यात शेळी गटासाठी पडताळणी अंती पहिल्या वर्षी पहिल्या सहा महिन्यात २५ टक्के व दुसऱ्या सहा महिन्यात उर्वरित २५ टक्के अनुदान थेट जमा करण्यात येणार आहे. तसेच दुधाळ जनावरे स्वखर्चाने खरेदी केल्यानंतर पडताळणी अंती लाभार्थीच्या खात्यात अनुदान दोन टप्प्यात खात्यात थेट जमा करण्यात येईल. या योजनेअंतर्गत यापूर्वी लाभ मिळाला असल्यास पाच वर्षाच्या कालावधीनंतर लाभ मिळण्यासाठी अर्ज करता येईल. निवड झालेल्या लाभार्थीस आदेश प्राप्त झाल्यापासून ४५ दिवसात प्रकल्प पूर्ण करायचा आहे. शेळी गटासाठी खरेदीपूर्वी गोठा बांधकाम करणे अनिवार्य राहील. ४५ दिवसात लाभार्थीने ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास पशुधन विकास अधिकारी (विस्तार) त्यांना नोटीस देवून त्याचे झालेली निवड रद्द करतील व प्रतिक्षा सुचिवरील लाभार्थ्यास लाभ देण्यात येईल. शेळी गटासाठी लाभार्थीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र राज्य मेंढी व शेळी विकास महामंडळाकडून किंवा शेळी बाजारातून शेळ्यांची खरेदी समिती सदस्यांच्या उपस्थितीमध्ये करायची आहे. तर दुधाळ गट खरेदी राज्याबाहेरुन खरेदी समिती सदस्यांच्या उपस्थितीमध्ये करावयाचे असून परराज्यातून वाहतूक खर्च देय राहील. तसेच राज्यांतर्गत खरेदी समिती सदस्यांच्या उपस्थितीमध्ये जिल्ह्यातून खरेदी केल्यास वाहतूक अनुदान देय राहणार नाही. दुधाळ व शेळी गटाचा तीन वर्षाचा विमा व वाहतूक खर्च लाभार्थीने स्वखर्चाने करायचा आहे. १ मे २००१ नंतर तिसरे हयात अपत्य नसणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातील इच्छुकांनी १८ डिसेंबरपर्यंत विहित नमुन्यात अर्ज तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांच्याकडे सादर करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यवतमाळ तथा निवड समिती अध्यक्ष यांनी केले आहे. अर्जाचा नमुना पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) कार्यालयाकडे उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी