दिव्यांगांना मिळणार फिरते दुकान ४ जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल अर्थात फिरते वाहनावरील दुकान मोफत उपलब्ध करुन देण्याची योजना राज्य शासनाने सुरू केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी दिव्यांगांनी ४ जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या योजनेला दि. १० जून २०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीची कार्यवाही महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, मर्या. यांचे स्तरावरुन सुरु आहे. योजनेचा उद्देश : दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे तसेच आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे. सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या परिवार, कुटुंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करणे हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेचा लाभ राज्यातील गरजू दिव्यांग व्यक्तींना मिळण्यासाठी अर्जदार नाव नोंदणी व अर्ज करण्यासाठी दि. ३ डिसेंबर रोजी पोर्टल प्रक्षेपित करण्यात आले असून दिव्यांग व्यक्तींकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यासाठी https://evehicleform.mshfdc.co.in हि लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या लिंकद्वारे दिव्यांग व्यक्तींना ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी दि. ४ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींनी घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

घरकुल लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद

कृषी महोत्सवात शेती विषयक माहितीचे विविध स्टॉल