कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना तृणधान्य पिकांच्या लागवडीचे प्रशिक्षण

कृषि संशोधन केंद्र, यवतमाळ येथे 'आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षे २०२३' निमित्त कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी तृणधान्य पिकांची ओळख व लागवड व्यवस्थापन या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण आणि प्रक्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणाचे आयोजन मध्य विदर्भ विभागाचे, सहयोगी संशोधन संचालक डॉ. प्रमोद यादगिरवार यांच्या अध्यक्षतेखाली २८ व २९ नोव्हेंबर २०२३ रोजी संपन्न झाले. या प्रशिक्षणाचे उद्घाटन करतांना जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे यांनी उपस्थित पांढरकवडा व पुसद उप-विभागातील अधिकारी व कर्मचान्यांना नाचणी, ज्वारी, कुटकी, भंगर, राजगीरा, राळा, वरई इ. तृणधान्य पिकांचे महत्व शेतकऱ्यांना पटवून देण्याचे आवाहन केले. जेणेकरुन शेतकरी अधिक उत्पन्न घेण्याचे दृष्टिने लागवड करतील. तसेच विद्यापिठामार्फत होत असलेल्या प्रशिक्षणादरम्यान मिळालेली माहिती संकलित करण्याच्या सूचना केल्या. याप्रसंगी कृ.जै.तं.महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एन. डी. पार्लावार यांनी तृणधान्य पिके भविष्यातील आधार असल्याचे सांगितले. अध्यक्ष भाषणात डॉ. प्रमोद यादगिरवार यांनी कुटकी, भगर, राजगीरा, राळा, वरइ इत्यादी लघु तृणधान्य पिकांना भविष्यातील अन्न म्हणून ओळखले जात असल्याचे सांगितले. तसेच लघु भरडधान्य पिकांचे आहारातील महत्व, समाजात या पिकांविषयी जागृती व प्रसार करणे याविषयी विस्तृत माहिती दिली. त्याच बरोबर त्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी, अधिकारी व इतरांना तृणधान्यांची प्रत्यक्ष ओळख होण्याच्या दृष्टीने कृषि संशोधन केंद्रासाठी असलेल्या प्रयत्नांची सुध्दा माहिती दिली. तांत्रिक सत्रात कृषि विज्ञान केंद्र, यवतमाळ कार्यालयाचे कार्यक्रम समन्वयक डॉ. सुरेश नेमाडे यांनी तृणधान्य पिकांच्या अन्न द्रव्य व्यवस्थापनाविषयी विस्तृत माहिती दिली. प्रभारी अधिकारी तथा प्रकल्प प्रमुख डॉ. अशितोष लाटकर यांनी ज्वारी, बाजरी व नाचणी आणि इतर लघु भरडधान्य पिकांचे लागवडी खालील क्षेत्र, पिकांची ओळख आणि लागवड तंत्रज्ञान विषयी सविस्तर तांत्रिक माहिती सांगितली. विषयतज्ञ डॉ स्नेहल भागवत यांनी पौष्टिक तृणधान्य यांचे आहारातील महत्व याविषयी मार्गदर्शन केले. दरम्यान कृषि संशोधन केंद्रामध्ये लागवड करण्यात आलेल्या सर्व तृणधान्यांची ओळख होण्याच्या दृष्टीने वरिष्ठ संशोधन सहायक डॉ. संदीप कदम यांनी प्रात्यक्षिक, पिक पाहणीव्दारे सर्व मिलेट पिकांची ओळख करून दिली. कार्यक्रमाचे संचालन डॉ. संदीप कदम यांनी केले तर आभार डी, एल. राठोड यांनी मानले. या प्रशिक्षणासाठी प्रदिप कांबळे, अमित सुरपाम, वंदना जाधव व राहुल धोटे यांनी प्रयत्न केले.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी