शेतकऱ्यांना पीक विमा नुकसानभरपाई देण्याचे विमा कंपनीला निर्देश

Ø जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीची सभा Ø ५० टक्क्यापेक्षा कमी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना महसूल व कृषि विभागाच्या पंचनाम्यानुसार पीक विमा भरपाई Ø ५ लाख २८ हजार ३०१ शेतकऱ्यांच्या पूर्व सूचना जिल्ह्यातील माहे जुलै ते सप्टेंबर या कालावधीत पीक नुकसानीच्या पूर्व सूचना दिलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा नुकसानभरपाई देण्याचे निर्देश जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीने रिलायंस जनरल विमा कंपनीच्या राज्य व्यवस्थापकांना दिले आहेत. प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगामांतर्गत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दि.४ डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीची आणि जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीची सभा जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवनात झाली. या सभेत हे निर्देश देण्यात आले. या सभेत जिल्ह्यातील माहे जुलै ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत पूर्व सूचना दिलेल्या ५ लाख २८ हजार ३०१ शेतकऱ्यांपैकी ज्या शेतकऱ्यांची नुकसानीची टक्केवारी ही ५० टक्केच्यावर आहे, त्या शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीच्या पर्यवेक्षकांनी केलेल्या पंचनाम्याप्रमाणे पीक विमा भरपाई द्यावी. तसेच ज्या शेतकऱ्यांचे नुकसान ५० टक्क्यापेक्षा कमी दर्शविलेले आहे. त्या सर्व शेतकऱ्यांना महसूल व कृषि विभागाने माहे जुलै व ऑगस्टमध्ये अतिवृष्टीच्या केलेल्या पंचनाम्याप्रमाणे पीक विमा भरपाई देण्याबाबतची कार्यवाही विमा कंपनीने करावी, असे निर्देश रिलायंस जनरल विमा कंपनीच्या राज्य व्यवस्थापकांना समितीने दिले. विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना तहसील कार्यालयात बसण्याच्या सूचना विमा कंपनीचे कार्यालये बंद असल्याच्या तक्रारी येत असल्यामुळे जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय सर्व पीक विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तहसील कार्यालयात बसण्याबाबत सूचना देण्यात आल्या. अवेळी पावसामुळे नुकसानीच्या पूर्व सूचनांचे पंचनामे क्षेत्रीय समितीमार्फतच करा मागील आठवड्यात आलेल्या अवेळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबच्या पूर्व सूचना मोठ्या प्रमाणात प्राप्त होत आहे. या पूर्व सूचनांचे पंचनामे प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या शासन निर्णयाप्रमाणे कुठल्याही परिस्थितीत क्षेत्रीय स्तरावरील समितीमार्फतच करावे, अशा सूचना रिलायंस जनरल विमा कंपनीच्या राज्य व्यवस्थापकांना समितीकडून देण्यात आल्या. या सभेत माहे जुलै ते सप्टेंबर २०२३ मध्ये अतिवृष्टीमुळे बाधीत शेतकऱ्यांनी ५ लाख २८ हजार ३०१ पूर्व सूचना दाखल केल्या होत्या, शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या पूर्व सूचनांचे पंचनामे झाले. या पंचनाम्याबाबत मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांकडून तक्रारी प्राप्त झाल्या. पीक विमा कंपनीने केलेल्या पंचनाम्यामध्ये काही शेतकऱ्यांचे नुकसान जास्त दाखविले तर काही शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन देखील शेतपिकाचे नुकसान अत्यंत कमी दाखविले असल्याची बाब जिल्हास्तरीय समितीच्या निदर्शनास आल्याने सर्व बाबींचा विचार करता जिल्हास्तरीय समितीने हे निर्णय घेतले आहेत, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी