लाभार्थ्यांनी केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा- आ.डाॅ.संदीप धुर्वे

वाघोली येथे विकसित भारत संकल्प यात्रा केंद्र व राज्य शासनाच्यावतीने सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येत आहे. या योजनांचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आ.डॅा.संदीप धुर्वे यांनी केले. केळापूर तालुक्यातील ग्रामपंचायत वाघोली येथे विकसित भारत संकल्प यात्रेचे उद्घाटन आ.डॅा.धुर्वे यांच्याहस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदारांसह तहसिलदार राजेंद्र इंगळे, गटविकास अधिकारी रविंद्रकुमार सांगळे तसेच विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, लाभार्थी, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजातील सर्वच घटकातील सर्वसामान्य व्यक्ती, कुटुंबासाठी केंद्र व राज्य शासनाच्यावतीने विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ वंचित लाभार्थ्यांना मिळावा यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा मोहिम राबविण्यात येत आहे. मोहिमेंतर्गत जिल्ह्यात रथाद्वारे योजनांची जनजागृती केली जात असून लाभार्थ्यांना थेट लाभ दिला जात आहे. विविध योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांनी यात्रा मोहिम कालावधीत लाभ घ्यावे, असे आवाहन डॉ.धुर्वे यांनी केले. घरकुलासाठी गरीब लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यामुळे घरकुलाच्या लाभार्थ्यांच्या अतिक्रमीत जमीनी नियमानुकुल करण्यासाठी तालुका भुमिअभिलेख कार्यालयाने तातडीने मोजणी करून नियमानुकूलची प्रकरणे मार्गी लावावे, असे ते म्हणाले. विविध योजनांची माहिती लाभार्थ्यांना देण्यात यावी, अशी सूचना त्यांनी केली. यावेळी आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड तसेच घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना मंजूरी आदेशासह विविध योजनेच्या लाभार्थ्यांना थेट लाभ देण्यात आला तसेच शेतकऱ्यांना फवारणी यंत्राचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. कार्यक्रमाला ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील यांच्यासह विविध विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी