जिल्हास्तरीय कृषी महोत्सव व कृषी प्रदर्शनीचे १३ ते १७ जानेवारी दरम्यान आयोजन पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते उद्घाटन होणार

राज्य शासनाचा कृषी विभाग व आत्मा प्रकल्प संचालक कार्यालयाच्या वतीने १३ ते १७ जानेवारी २०२४ दरम्यान जिल्हास्तरीय कृषी महोत्सव व कृषी प्रदर्शनीचे आयोजन पोस्टल ग्राउंड (समता मैदान) यवतमाळ येथे करण्यात येणार आहे. त्याचे उद्घाटन पालकमंत्री संजय राठोड, यांच्या शुभहस्ते होणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी, डॉ. पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनाखाली काम होत आहे. तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्ह्यातील खासदार व सर्व आमदार असणार आहेत. या महोत्सवामध्ये शेतकरी, शेतकरी गट शेतकरी उत्पादक कंपन्यांनी उत्पादित केलेले धान्य जसे गहू ज्वारी विविध प्रकारच्या डाळी जसे मुगडाळ, तुरडाळ, उडीद डाळ, हरभरा डाळ, विविध प्रकारचा भाजीपाला, जिल्ह्यात पिकत असलेले विविध प्रकारचे फळे जसे संत्रा, लिंबू, मोसंबी, चिकू, सिताफळ, पेरू, ड्रॅगन फ्रुट याशिवाय वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून प्रक्रियायुक्त पदार्थ जसे लोणची, पापड, हळद पावडर, मिरची पावडर, गुळ, मसाले इत्यादी बाबी शहरातील ग्राहकांना खरेदी करता येणार आहेत. याशिवाय सेंद्रिय शेतीमधील सेंद्रिय गहू सेंद्रिय डाळी सेंद्रिय भाजीपाला सेंद्रिय पदार्थ द्वारे पिकवण्यात आलेले फळे इत्यादी सुद्धा ग्राहकांना विकत घेता येणार आहे. या कृषी महोत्सव व प्रदर्शनीच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शेतमालाला एक चांगला भाव मिळवून देणे, त्यांची विक्री व्यवस्था निर्माण करणे तसेच शहरातील ग्राहकांना रास्त दरामध्ये शेतमाल उपलब्ध करून देणे हा उद्देश या महोत्सवाचा आहे. यामध्ये कृषी व्यतिरिक्त जिल्हास्तरीय वेगवेगळ्या शासकीय विभागांचे दालन सुद्धा असणार आहेत. ज्यामध्ये त्या त्या विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे. महिला बचत गटांनी तयार केलेले विविध वस्तू पदार्थ तसेच फूड स्टॉलचे सुद्धा आयोजन करण्यात आलेले आहे. ज्यामध्ये शहरातील ग्राहकांना वेगवेगळ्या पदार्थांची चव चाखता येणार आहे. याव्यतिरिक्त शेतीसाठी लागणारे विविध अवजारे, रासायनिक खते, बी बियाणे, रासायनिक कीटकनाशके शेतीमध्ये संरक्षित सिंचनाकरिता वापरण्यात येणारी सूक्ष्म सिंचन तसेच सोलर पंप इत्यादींची सुद्धा माहिती मिळणार आहे. यासोबत दररोज शेतकरी बांधवांसाठी विविध पिकाचे लागवड तंत्रज्ञान, कीड रोग व्यवस्थापन, रेशीम शेती, कृषी अन्न प्रक्रिया, पौष्टिक तृणधान्य लागवड तसेच पाककला स्पर्धा, शेतमालाचे विपणन व निर्यात इत्यादी विषयांचे तांत्रिक सत्र सुद्धा आयोजित करण्यात येणार आहे. तसेच दररोज संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शेतकरी तसेच शहरातील ग्राहकांनी या कृषी महोत्सवाचा लाभ घ्यावा,असे आवाहन आत्माचे प्रकल्प संचालक व कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी