हरभऱ्यावरील घाटेअळीचे एकात्मिक व्यवस्थापन करण्याचे आवाहन

हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी हरभरा पिकावरील घाटेअळीचे एकात्मिक व्यवस्थापन करण्याचे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी जे आर राठोड यांनी केले आहे. सद्यस्थितीत हरभऱ्याचे पीक वाढीच्या अवस्थेत आहे. बहुतांश ठिकाणी फुलोरा अवस्थेत प्रवेश करेल व या दरम्यान या घाटेअळीच्या प्रादुर्भावाची शक्यता आहे. घाटे अळीही हरभरा पिकावरील प्रमुख कीड असून या किडीची मादी पंतग पानावर, कोवळ्या शेंड्यावर, कळ्यावर व फुंलावर एकेरी अंडे घालतात ही अंडी खसखशीच्या दाण्यासारखी दिसतात. त्यातुन 2 ते 3 दिवसात अळी बाहेर पड़ते ही अळी पानावरील हरीतद्रव्य खरडून खाते. त्यामुळे पान प्रथम पिवळसर पांढुरी होवून वाळतात व गळून पडतात थोड्या मोठ्या झालेल्या अळ्या संपूर्ण पाने व कोवळी देठे खावुन फस्त करतात. त्यामुळे झाडावर फक्त फांद्या शिल्लक राहतात. पूढे पिक फुलोऱ्यावर आल्यावर ह्या अळीचा प्रादुर्भाव वाढतो व अळया प्रामुख्याने फुले व घाटंयाचे नुकसान करतात. मोठ्या झालेल्या अळ्या घाटयाला छिद्र करून आतील दाणे खावुन घाटे पोखरतात एक अळी साधारणतः 30 ते 40 घाटंयाचे नुकसान करते. एकात्मिक व्यवस्थापन : घाटेअळीचे परभक्षक उदा. बगळे, मैना, राघो, निळकंठ, काळी चिमणी इत्यादी पिकामध्ये फिरुन घाटेअळया वेचुन त्यांचे पिकावरील नियंत्रण करतात अवाजवी किटकनाशकाची फवारणी केल्यास पक्षी किटकनाशकांचे वासामुळे शेतामध्ये येणार नाहीत. त्यामुळे किटकनाशकाचा जास्त वापर टाळावा. ज्या शेतामध्ये मका किंवा ज्वारीचा नैसर्गिक पक्षी थांबे म्हणून उपयोग केला नसेल त्या शेतामध्ये बांबूचे त्रिकोणी पक्षी थांबे (प्रति हेक्टरी 20 पक्षी थांबे) तयार करुन शेतामध्ये लावावे. त्यामुळे पक्ष्यांचे अळ्या वेचण्याचे काम सोपे होते. कामगंध सापळ्याचा वापर करावा. यासाठी घाटे अळीचे कामगंध सापळे (हेक्झाल्यूर) एकरी दोन किंवा हेक्टरी पाच सापळे याप्रमाणे लावावेत. सापळ्यामधे सतत तिन दिवस आठ ते दहा पतंग आढळल्यास व्यवस्थापनाचे उपाय योजावेत. शेतकरी बंधुनों आपल्या पिकाचे निरीक्षण करुन किडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास किवां 40 ते 50 टक्के पिक फुलोऱ्यावर आल्यानंतर घाटेअळीचे व्यवस्थापणासाठी खालील दोन फवारण्या 10 लिटर पाण्यात मिसळून कराव्या. 50 टक्के फुलोऱ्यावर असतांना पहिली फवारणी करावी निबोळी अर्क 5 टक्के किंवा एच ए.एन पीव्ही (1x10)9 पी.ओ.बी / मिली 500 एल ई/ हे किवां क्विनॉलफॉस 25 ईसी 20 मिली वापरावे. पहिल्या फवारणीनंतर 15 दिवसानंतर दूसरी फवारणी करावी. यात इमामेक्टीन बेझोंएट 5 टक्के एस जी 4 ग्रॅम किवां इथीऑन 50 टक्के इसी 25 मिली किंवा फल्यूबेडामाईड 20 टक्के डब्लुजी 5 मिली किंवा क्लॅारॅट्रनीप्रोल 18.5 टक्के एस सी 2.5 मिली किंवा इंडोक्झाकार्ब 15.80 ईसी 6.6 मिली किंवा लॅबडा सायहेलोथ्रीन 0.5 इसी 10 मिली वापरावे. शेतकरी बांधवांनी वेळीच हरभरा पिकावरील कीड व रोंगाच्या नियंत्रणासाठी एकात्मिक व्यवस्थापन करावे. कृषि विज्ञान केंद्र, तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक किंवा कृषि सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा, असे उपविभागीय कृषि अधिकारी जे आर राठोड यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी