तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे एकात्मिक व्यवस्थापन करा कृषी विभागाचे आवाहन

रब्बी हंगामास सुरुवात झाली असून तूर पिक शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये आहे. तूर पीक संरक्षणाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना काळजी घेवून वेळीच कीड व रोगाचे व्यवस्थापन करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. पिकांचे संरक्षण केल्यास समाधानकारक उत्पन्न मिळू शकते. तुरीवरील शेंगा पोखणाऱ्या अळीचे वेळीच व्यवस्थापन न केल्यास कीड पिकाचे नुकसान करते. शेंगा पोखरणाऱ्या अळ्या सुरवातीला पिकांच्या कोवळ्या पानावर फुलांवर किवां शेंगावर उपजिविका करतात. नंतर शेंगा भरतांना त्या दाणे खातात. दाणे खात असतांना त्या शरीराचा पुढील भाग शेंगामध्ये खूपसुन व बाकीचा भाग बाहेर ठेवलेल्या अवस्थेत आढळतात, त्यामुळे आतील कोवळ्या दाण्याचे जवळपास ६० ते ८० टक्के नुकसान होते. त्यामुळे अळीचे एकात्मिक व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. एकात्मीक व्यवस्थापन कसे करावे : सुरुवातीच्या काळात ५ टक्के निबोंळी अर्काची फवारणी करावी. तुरीवरील मोठ्या अळ्या वरचेवर वेचून त्यांचा नायनाट करावा. तुरीमध्ये एकरी ४ कामगंध सापळे पिकांच्यावर एक फुट उंचीवर लावावेत. जैविक किटकनाशके : तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या हेलीकोव्हरपा अळीच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी एचएएन पीव्ही प्रति हेक्टर ५०० रोगग्रस्त अळ्याचा अर्क (१x १० तीव्रता) फवारावा. विषाणुच्या फवाऱ्याची कार्यक्षमता अतीनिल किरणात टिकविण्यासाठी अर्धा लिटर पाण्यात ५० ग्रॅम राणीपॉल टाकून हे द्रावण एक मिली प्रति लीटरप्रमाणे अर्कात मिसळून फवारणी करावी. रासायनिक किटकनाशके : तुरीवरील शेंगा पोखराणाऱ्या हेलीकोव्हरपा अळीच्या व्यवस्थापणासाठी किडीनी आर्थिक नुकसानीची संकेत पातळी गाठल्यानंतर (१० ते २० अळ्या प्रति झाडे) इमामेक्टीन बेंझोएट ५ एस.जी. ३ ग्रॅम किंवा क्लोरॅनट्रेनिलीप्रोल १८.५, एस.सी. २.५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तुरीवरील शेंगमाशीच्या व्यवस्थापणाकरीता क्विनॉलफॉस २५ टक्के ईसी २० मिली किंवा मोनोक्रोटोफॉस ३६ एसएल ११ प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. रोग व त्यांचे व्यवस्थापन : मर हा रोग फयुजारीयम उडम या जमीनीत वास्तव्य करणाऱ्या बुरशीमुळे होतो. पानाच्या शिरा कोवळ्या होतात. पाने पिवळी पडतात, झाडांचे पाने मलूल होतात व कोमेजतात. झाड हिरव्या स्थितीत वाळते. जमिनीलगतच्या खोडाचा भाग काळ्या रंगाचा बनतो, मुळ उभे चिरले असता मुळाचा मध्य भाग काळा दिसतो यात बुरशीची वाढ झालेली दिसते. कधी कधी खोडावर पांढरी बुरशी सुद्धा आढळते. व्यवस्थापन : पिकांची दिर्घकालीन फेरपालट अवलंबवावी, रोग प्रतिबंधक जाती पेराव्यात. पेरणीपुर्वी मिश्र बुरशीजनक कार्बाक्सीन ३७.५ टक्के ३ ग्रॅम प्रति किलो व ट्रायकोडर्मा व्हीरीडी ४ ग्रॅम प्रति किलो प्रमाणे बीज प्रक्रिया करावी. खोडावरील करपा : कोलेटोट्रायकम करपा हा रोग कोलेटोट्रायकम डिमॅशियम या बुरशीमुळे होतो. खोडावर, फांद्यावर काळ्या करड्या रंगाचे चट्टे आढळतात. रोगाची तीव्रता अधिक असल्यास फांद्या व झाडे वाळतात. व्यवस्थापन : प्रतिबंधक उपाय म्हणून शेतातील रोगट फांद्या व झाडे जाळून नष्ट करावी. शेतकरी बांधवांनी वेळीच तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रणासाठी एकात्मिक व्यवस्थापन करावे. अधिक माहितीसाठी कृषि विद्यापीठ, कृषि विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, यांच्याशी संपर्क साधावा़, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी जे आर राठोड यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी