अडाण प्रकल्पाच्या मुख्य कालवा व वितरण प्रणालीच्या दुरुस्तीसाठी १८२ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

पालकमंत्री संजय राठोड यांनी दिलेला शब्द पाळला ५२०७ हेक्टर क्षेत्र पुर्नस्थापित होणार विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत अडाण मध्यम प्रकल्पांतर्गत मुख्य कालवा व वितरण प्रणालीच्या दुरुस्तीसाठी १८२ कोटी १ लाख ४९ हजार ६९३ रुपये खर्चाच्या प्रस्तावास राज्य शासनाकडून सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. विशेष दुरुस्तीअंतर्गत प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता कामाच्या अंदाजपत्रकानुसार या खर्चाच्या प्रस्तावास देण्यात आली आहे. त्याचा शासन निर्णय १५ डिसेंबर रोजी जारी करण्यात आला आहे. अडाण प्रकल्पाचे पाणी शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी जवळजवळ दोनशे कोटींचा निधी आणणार असल्याचा शब्द पालकमंत्री संजय राठोड यांनी जाहीर सभेत दिला होता. हा दिलेला शब्द पाळण्यासाठी पालकमंत्र्यांनी शासनस्तरावर कसोशीने प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून त्यांनी दिलेला शब्दही पूर्ण केला आहे. या प्रकल्पामुळे वाशिम जिल्यातील कारंजा आणि यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्रातील शेतजमीन सिंचनाखाली येण्यास मदत होणार आहे. अडाण मध्यम प्रकल्प हा विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत गोदावरी खोरे अंतर्गत वैनगंगा उपखोऱ्यात असून वाशिम जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यातील म्हसनी पिंप्री या गावाजवळ अडाण नदीवर बांधण्यात आलेला आहे. प्रकल्प सर्वसाधारण क्षेत्रातील आहे. धरणास ६५ कि.मी. लांबीचा उजवा कालवा आहे. या प्रकल्पांतर्गत वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील १०५ हेक्टर व यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील ९९६२ हेक्टर असे एकूण १००६७ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आलेले आहे. या प्रकल्पाच्या कामास सन १९७४ मध्ये प्रारंभ होवून घळभरणीसह धरणाचे काम सन १९७७ मध्ये पूर्ण झाले आहे. सन १९७७ पासून अंशतः सिंचनास सुरूवात होवून सन १९९९ साली पूर्ण होवून साधारणतः २० वर्षापूर्वी झालेले आहे. मुख्य कालव्याचे तळरुंदीत तफावत असल्याने पुच्छ भागात पाणी पोहचत नाही. सद्य:स्थितीत हा प्रकल्प जुना असल्याने व नियमित देखभाल व दुरुस्ती नसल्याने या कालव्याचे अस्तरीकरण व बरीच बांधकामे जसे-जलसेतू,नलिकामोरी, सुपर पॅसेज, विमोचके इत्यादी ही क्षतिग्रस्त झालेली आहेत. हा कालवा कंटूर पध्दतीचा असल्याने एका बाजुने टेकडी व दुसऱ्या बाजूने भराव अशी स्थिती असून या भरावातून झोन सेक्शन नसल्यामुळे बरेच पाणी पाझरुन जाते. प्रकल्पावरील मुख्य कालव्याचे तळरुंदीत तफावत असल्याने २५ किमीच्या पुढील भागात अपेक्षित एफएसडी उपलब्ध होत नसल्याने लघु कालव्यातून पाणी जाण्यास्तव ड्रायव्हिंग हेड उपलब्ध होत नाही. त्यामुळे मुख्य कालव्याचे पुच्छ भागात पूर्ण क्षमतेने पाणी पोहचत नाही. या कामास विशेष दुरूस्ती अंतर्गत ९७ कोटी ७३ लाख रुपये किंमतीस मुळ प्रशासकीय मान्यता १८ सप्टेंबर २०१९ रोजी प्रदान करण्यात आलेली आहे. या प्रस्तावामध्ये अडाण प्रकल्पाच्या मुख्य कालव्याच्या संपूर्ण लांबीत कालव्याच्या सुधारित संकल्पनानुसार रिसेक्शनिंग करुन मुरूम बेडिंगसह अस्तरीकरणाचे काम तसेच जलसेतुंची दुरुस्ती, क्रॉस रेग्युलेटरची पुर्नबांधणी, एसडब्ल्यूएफची दुरुस्ती तसेच कालव्यावरील सरळ विमोचकास जलमापक संयंत्रे बसविणे प्रस्तावित केलेले आहे. आरसीसी बॉक्स कंडक्टर नव्याने प्रस्तावित केला आहे. मुख्य कालव्याच्या पूर्ण लांबीतील गाळ, झाडे झुडपे,गवत काढणे व वितरण प्रणालीची आवश्यक लांबीत अस्तरीकरण, भरावाची उंची वाढविणे, व्दार दुरुस्ती, गाळ, गवत काढणे व त्यावर लघु वितरिकेवर जलमापक संयंत्रे बसविणे प्रस्तावित केले आहे. या अडाण प्रकल्पाच्या कालव्याच्या दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्यानंतर ५२०७ हेक्टर क्षेत्र पुर्नस्थापित होणार आहे. याअनुषंगाने अडाण मध्यम प्रकल्पाच्या मुख्य कालवा व वितरण प्रणालीच्या या कामास विशेष दुरुस्ती अंतर्गत प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्याप्रमाणे शासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी