महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा आता सर्वांनाच लाभ


v  यवतमाळ जिल्ह्यातील 20 रुग्णालयांचा समावेश

यवतमाळ, दि. 01 : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन राज्य शासनाने महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत आता सर्वच कुटुंबांना मोफत लाभ देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या आदेशानुसार कोरोनाबाधित रुग्ण व कोरोनाची लागण नसलेल्या इतर आजाराच्या सर्व लोकांना महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत असलेल्या सर्व रुग्णालयात उपचार घेता येणार आहेत.

महत्वाच्या शासकीय रुग्णालयामध्ये 120 आजारावर उपचार घेण्यासाठी तयार केलेल्या विशेष पॅकेजमधील गर्भपिशवीचे ऑपरेशन, हर्नियाचे ऑपरेशन यासारखा अन्य 120 उपचारासाठीच्या विशेष व्यवस्थेचा लाभ आता घेता येणार आहे. या योजनेत 996 आजारावरील उपचाराची सोय असून प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत 1209 आजारावर उपचार केले जातात.

23 मे 2020 रोजी शासनाने काढलेल्या आदेशानुसार ज्या लाभार्थ्यांकडे पांढरी शिधापत्रिका आहे ते सुध्दा या योजनेसाठी पात्र आहे. एका खाजगी कंपनीच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येत असून ज्या 120 उपचार पद्धती खाजगी रुग्णालयात देण्यात आल्या आहेत. त्याची मुदत 31 जुलै 2020 पर्यंत निश्चित करण्यात आली आहे. तरी जिल्ह्यातील सर्व जनतेने या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केले आहे.

योजनेसंदर्भात शासन निर्णयातील ठळक वैशिष्ट्ये : सुधारीत महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेशी प्रधानमंत्री जनआरोग्य योजना संलग्नीकरण करून एकत्रित स्वरुपात मे.युनाइटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या सहकार्याने दिनांक 1 एप्रिल 2020 पासून अंमलात आली आहे. योजनेंतर्गत अनुज्ञेय 996 उपचार पध्दतीचा लाभ मान्यता प्राप्त दराने सर्व अंगीकृत रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात येतील.

शासकीय रुग्णालयाकरीता राखीव असलेल्या 134 उपचारापैकी 120 उपचार अंगीकृत खाजगी रुग्णालयांना 31 जुलै 2020 पर्यंत मान्यता प्राप्त दराने उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच काही किरकोळ व मोठे उपचार आणि काही तपासण्या ज्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत समाविष्ट नाहीत, ते उपचार व तपासण्या सदरील योजनेंतर्गत अंगीकृत रुग्णालयामध्ये सर्व लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. योजनेच्या अधिक माहितीकरीता अंगीकृत रुग्णालयातील आरोग्यमित्राशी किंवा टोल फ्री क्रमांक 155388 किंवा 18002332200 या क्रमांकावर संपर्क करावा.

 

महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत यवतमाळ जिल्हृयातील समाविष्ठ रुग्णालये : यवतमाळ जिल्ह्यात एकूण 20 रुग्णालये महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ठ आहेत. यात सहा शासकीय तर 14 खाजगी आहेत. यात यवतमाळ येथील श्री. वसंतराव नाईक शासकीय रुग्णालय व महाविद्यालय, चिंतामणी हॉस्पिटल, शांती ऑर्थोपेडिक हॉस्पिटल, संजीवन मल्टी स्पेशियालिटी हॉस्पिटल, साई श्रध्दा मल्टी स्पेशियालिटी हॉस्पिटल, शाह मल्टी स्पेशियालिटी हॉस्पिटल, पोटे हॉस्पिटल, कॉटन सिटी मल्टी स्पेशियालिटी हॉस्पिटल, श्री दत्त हार्ट हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्युट, पुसद येथील लाईफ लाईन मल्टी स्पेशियालिटी हॉस्पिटल, मेडिकेअर मल्टी स्पेशियालिटी हॉस्पिटल, चव्हाण हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर हॉस्पिटल, भांगडे चिल्ड्रेन हॉस्पिटल, दिग्रस येथील आरोग्यधाम मल्टी स्पेशियालिटी हॉस्पिटल, उमरखेड येथील सेवा स्पेशियालिटी हॉस्पिटल, पांढरकवडा येथील उपजिल्हा रूग्णालय, पुसद येथील उपजिल्हा रुग्णालय, दारव्हा येथील उपजिल्हा रुग्णालय, वणी येथील ग्रामीण रुग्णालय आणि दिग्रस येथील ग्रामीण रुग्णालय यांचा समावेश आहे.

००००००००


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी