जीवनावश्यक वस्तुंच्या पुरवठ्याकडे लक्ष द्या - पालकमंत्री राठोड




Ø नेर आणि दारव्हा येथील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी

यवतमाळ, दि. 27 : नेर येथे कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने शहरातील काही भाग प्रतिबंधित घोषित केला आहे. मात्र या प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी जीवनावश्यक वस्तुंच्या पुरवठ्याकडे प्रशासनाने गांभिर्याने लक्ष द्यावे, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले.

नेर येथील नवाबपुरा या प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी करून आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जि.प.अध्यक्षा कालिंदा पवार, जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, जिल्हा पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, श्रीकांत देशपांडे, इब्राहीम चौधरी  आदी उपस्थित होते.

कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता येथील व्यापा-यांनी स्वयंस्फुर्तीने सात दिवसांचा बंद ठेवला, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, नागरिकांच्या सुविधेकरीता अत्यावश्यक वस्तुंच्या सेवेची दुकाने सकाळी 8 ते 12 या वेळेत सुरू ठेवण्याबाबत नियोजन करावे. मात्र कोठेही गर्दी होणार नाही. तसेच शासन आणि प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे उल्लंघन होणार नाही, याची प्रत्येक नागरिकाने काळजी घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

येथील क्वॉरंटाईन सेंटरमध्ये 94 रुग्ण आहे. या सेंटरची साफसफाई व येथे असलेल्या नागरिकांच्या जेवणाकडे व्यवस्थित लक्ष द्यावे. कोणत्याही परिस्थितीत स्वच्छतेकडे दुर्लक्ष खपवून घेतले जाणार नाही. क्वॉरंटाईन कक्षाची स्वच्छता हा विषय येथील नगर पालिका आणि आरोग्य विभागाकडे आहे. त्यामुळे याबाबत संबंतिधत विभागाने गांभिर्याने कामे करावी, अशा सुचनाही त्यांनी दिल्या.

तत्पूर्वी नेर येथील विश्रामगृहात आयोजित बैठकीत पालकमंत्र्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी प्रतिबंधित क्षेत्राबाबत तसेच कोरोना संदर्भात प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांबाबत पीपीटीद्वारे सादरीकरण केले. नेर येथे आतापर्यंत 37 पॉझेटिव्ह रुग्ण आढळले असून दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे. 37 पैकी 22 जण फक्त सहा कुटुंबातील आहे. जिल्ह्यात दारव्हानंतर नेर येथील सर्वाधिक नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. तालुक्यातून आतापर्यंत 480 नमुने तपासण्यात आले आहे. तर आतापर्यंत बाहेर गावावरून आलेल्या 3014 नागरिकांची नोंद प्रशासनाकडे असल्याचे जिल्हाधिका-यांनी सांगितले.

बैठकीला उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्र्यांची दारव्हा येथील प्रतिबंधित क्षेत्र व उपजिल्हा रुग्णालयाला भेट : दारव्हा येथे दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत असल्याने पालकमंत्री संजय राठोड यांनी शहरातील शिवाजी नगर या प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी केली तसेच येथील उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली. क्वॉरंटाईन सेंटरमध्ये काही अडचण आहे का, जेवण वेळेवर मिळते का, साफसफाई नियमित आणि वेळेवर होते का, असे प्रश्न विचारून त्यांनी क्वॉरंटाईन असलेल्या नागरिकांशी संवाद साधला. तसेच प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना मिळणा-या धान्य वितरणाबाबतसुध्दा त्यांनी माहिती जाणून घेतली. आवश्यकता असल्यास येथे आणखी धान्य किट उपलब्ध करून दिले जाईल, असेही सांगितले.

यावेळी तहसीलदार डॉ. संतोष डोईफोडे यांनी पीपीटी सादरीकरणाद्वारे कोव्हीड - 19 बाबत पालकमंत्र्यांना माहिती दिली. दारव्हा तालुक्यात आतापर्यंत 46 रुग्ण आढळून आले असून तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे. दारव्हा येथून सर्वाधिक 540 नमुन्यांची तपासणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीला अपर जिल्हाधिकारी सुनील महिंद्रीकर उपस्थित होते.

 

00000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी