एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु, एक पॉझेटिव्ह




Ø यवतमाळ शहरात कोरोनाची पुन्हा एन्ट्री

Ø ‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ : दोघांना डिस्चार्ज

यवतमाळ, दि. 17 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये उपचार घेत असलेल्या 58 वर्षीय व्यक्तिचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. तर यवतमाळ शहरात बुधवारी नव्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने कोरोनाची शहरात पुन्हा एन्ट्री झाली आहे. तसेच आयसोलेशन वॉर्डात भरती असलेले व उपचारानंतर ‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ झालेल्या दोन जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

बुधवारी कोरोनामुळे मृत्यु झालेला व्यक्ती हा मूळचा अकोला येथील असून 14 जून रोजी तो येथील वैद्यकीय महाविद्यालयात भरती झाला होता. पाच दिवसांपासून त्याला खोकला आणि ताप होता. 15 जून रोजी त्याला व्हेंटीलेटर लावण्यात आले. मात्र 17 जूनच्या रात्री 1 वाजता त्याचा मृत्यु झाल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

यवतमाळ शहरात कोरोनाची पुन्हा एन्ट्री : गत तीन महिन्यांपासून यवतमाळ शहरात असलेला कोरोनाचा उद्रेक पूर्णपणे शांत झाला होता. शहराची कोरोनामुक्तीकडे वाटचाल होत असतांनाच पुन्हा शहरात कोरोनाची एन्ट्री झाली आहे. नेताजी चौक येथील 45 वर्षीय व्यक्ती औरंगाबाद येथून आला असता त्याचा रिपोर्ट पॉझेटिव्ह आला आहे. सदर व्यक्तिला दोन – तीन दिवसांपासून ताप आणि खोकला आहे. तसेच त्याने सुरवातीला खाजगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर खाजगी रुग्णालयाने त्याला वैद्यकीय महाविद्यालयात पाठविले. या व्यक्तिच्या कुटुंबातील 9 सदस्यांना कोव्हीड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. कोरोनामुक्त झालेले यवतमाळ शहर पुन्हा एकदा कोरोनाच्या रडारवर आले आहे.

बुधवारी एकाचा रिपोर्ट पॉझेटिव्ह आल्याने जिल्ह्यात एकूण 42 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्ण आहेत. आयसोलेशन वॉर्डात सद्यस्थितीत 41 जण भरती आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने आज 100 नमुने तपासणीकरीता प्रयोगशाळेत पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत 2933 नमुने तपासणीकरीता पाठविण्यात आले असून यापैकी 2790 प्राप्त तर 143 अप्राप्त आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 198 झाली आहे. यात सद्यस्थितीत ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह 42 रुग्ण आणि उपचारानंतर बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 148 आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत आठ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 2592 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे.

प्रशासनाचे आवाहन : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सर्व नागरिकांनी या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी इतरांच्या सपंर्कात येऊ नये. अत्यावश्यक वस्तुंच्या खरेदीकरीता बाजारात गेल्यास सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करावे. तसेच मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. अनावश्यकपणे नागरिकांनी बाहेर फिरू नये. साबणाने वारंवार स्वच्छ हात धुवावे व नियमित सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले आहे.

००००००


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी