नेर येथील प्रतिबंधित क्षेत्रात जिल्हाधिकारी ‘ऑनफिल्ड’


v तालुकास्तरीय समिती व अधिका-यांना दिल्या सुचना

यवतमाळ, दि. 12 : गुरुवारी नेर येथील दोन जणांचा रिपोर्ट पॉझेटिव्ह आल्यामुळे शहरातील तेलीपूरा व आनंदवाडी हा भाग जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. या प्रतिबंधित क्षेत्रात प्रशासनाच्यावतीने करण्यात येणा-या उपाययोजनांची अंमलबजावणी व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी शुक्रवारी स्वत: प्रतिबंधित क्षेत्रात ‘ऑनफिल्ड’ होते.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, जिल्हा पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, उपविभागीय अधिकारी इब्राहीम चौधरी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब चव्हाण, तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.

नेर येथील तेलीपूरा आणि आनंदवाडी येथील दोन जणांचे रिपोर्ट पॉझेटिव्ह आले आहेत. यापैकी एक जण गंभीर आहे. पॉझेटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील सर्व नागरिकांचे नमुने यवतमाळ येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेत (व्हीआरडीएल लॅब) त्वरीत पाठवावे, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना दिल्या आहेत.

नेर येथील प्रतिबंधित क्षेत्रात जवळपास एक हजार घरे असून लोकसंख्या पाच हजार आहे. या सर्व नागरिकांची थर्मल स्कॅनर आणि पल्स ऑक्सीमीटरने आरोग्य तपासणी करण्याचे आदेश दिले आहे. यासाठी आरोग्य विभागाच्या 90 चमु लावण्यात आल्या आहेत. या आरोग्य पथकाद्वारे रोज सकाळी 8 ते दुपारी 2 या वेळेत आरोग्य तपासणी करण्यात येईल. तसेच पूर्ण शहरात 9 वॉर्ड असून यासाठी पाच फिवर क्लिनीक स्थापन करण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिका-यांना दिले.

यावेळी जिल्हाधिका-यांनी खाजगी डॉक्टर्स आणि मेडीकल स्टोअर्सच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. एखाद्या खाजगी डॉक्टर किंवा मेडीकलमध्ये सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण लगातार येत असल्यास त्याची सुचना त्वरीत तालुकास्तरीय समितीला द्यावी. नेरमध्ये मुंबई, पुणे किंवा राज्याच्या इतर रेड झोनमधून आलेल्या नागरिकांची नोंद घेणे, त्यांची आरोग्य तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे. यात कोणताही निष्काळजीपणा होता कामा नये, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिका-यांनी दिले.

नेर शहराची लोकसंख्या 34 हजाराच्या जवळपास असून पुढील चार दिवसात म्हणजे रविवारपासून बुधवारपर्यंत तपासणी मोहीम हाती घेण्यात येणार आहे. यासाठी 75 शिक्षक सर्वे करतील. तसेच थर्मल स्कॅनर आणि पल्स ऑक्सीमीटरच्या सहाय्याने तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी यांनी प्रतिबंधित क्षेत्राकरीता 25 होमर्गार्ड 24 तास ड्यूटीकरीता उपलब्ध करून दिले आहे. याबाबत जिल्हा पोलिस अधिक्षकांनी नियोजन करावे. तसेच तालुकास्तरीय समितीने अलर्ट मोडवर राहून काम करावे, अशाही सुचना त्यांनी दिल्या.

००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी