कापूस खरेदीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा



v  बंद कापूस खरेदी केंद्र तातडीने सुरू करण्याचे निर्देश

यवतमाळ, दि. 09 :  शेतकऱ्यांनी नोंदणी केलेल्या कापूस खरेदीचे नियोजन त्वरीत करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी संबंधित अधिका-यांची आढावा बैठक घेतली. बंद कापूस खरेदी केंद्र तातडीने सुरू करणे व कापूस जिनिंग सुरू झाली की नाही, याची खात्री करण्यासाठी संबंधित अधिका-यांनी प्रत्यक्ष जिनिंगला भेट द्यावी, निर्देश जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी दिले.

            जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक रमेश कटके, कापूस पणन महासंघ, सीसीआयचे अधिकारी, जिनिंग व्यवस्थापक व जिल्ह्यातील सहकारी संस्थेचे तालुका सहाय्यक निबंधक आदी उपस्थित होते.

यवतमाळ तालुक्यात एकूण चार जिनिंग सुरु आहे. त्याद्वारे मागील आठवडयात किती कापूस खरेदी केला व किती कापूस खरेदी करणे बाकी आहे. सदर चार जिनिंग पाऊस आल्यामुळे बंद असल्याने त्याबाबत पुढे काय नियोजन केले आहे, अशी विचारणा जिल्हाधिका-यांनी केली असता त्वरीत कापूस खरेदी सुरु करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघाचे विभागीय व्यवस्थापक यांनी सांगितले. कळंब येथील दोन जिनिंगपैकी एक बंद असून सदर जिनिंगला भेट देण्याबाबत 10 दिवसापांसून निर्देश दिलेले असतांनाही सहाय्यक निबंधक यांनी तेथे भेट दिली नाही व कापूस खरेदी करण्याबाबत हलगर्जीपणा केल्याबाबत जिल्हाधिकारी यांनी नाराजी व्यक्त केली. 

बाभुळगाव तालुक्यातील जिनिंगमध्ये 9 जून पासून पुन्हा कापूस खरेदी सुरू करणार असल्याचे कॉटन फेडरेशन अधिका-यांनी सांगितले. राळेगाव तालुक्यामध्ये सहा जिनिंग, दारव्हा तालुक्यामध्ये दोन जिनिंग सुरू असून सीसीआयची खरेदी सुरु असल्याचे तसेच मारेगाव येथेही कापूस खरेदी सुरु असल्याचे  संबंधीत सहाय्यक निबंधक यांनी सांगितले. महागाव तालुक्यात 1 ते 6 जुन पर्यंत प्रत्येक दिवशी 70 कापूस गाडया खरेदी करण्यात आल्या आहेत. उर्वरीत 5.50 लाख क्विंटल कापूस खरेदीचे तातडीने नियोजन करण्याबाबत जिल्हाधिकारी सिंह यांनी निर्देश दिले.

यावेळी जिल्हाधिकारी यांनी बंद पडलेले कापूस केंद्रे त्वरीत सुरु करण्याचे निर्देश दिले. तसेच नोंदणी केलेल्या शेतक-यांची संख्या, यापैकी आतापर्यंत किती शेतक-यांचा कापूस खरेदी केला व किती शिल्लक आहे, याची माहिती तालुकानिहाय सादर करावी, असे आदेशही त्यांनी उप निबंधक, सहकारी संस्था यांना दिले.

०००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी