खरीप हंगामाकरीता खते, बियाणे प्राधान्याने बोलवा




Ø जिल्हाधिका-यांच्या कृषी विभागाला सुचना

यवतमाळ, दि. 18 : खरीप हंगामाला सुरवात झाली असून शेतक-यांकडून बियाणे आणि खतांची मागणी वाढली आहे. कोणत्याही परिस्थतीत जिल्ह्यात खते, युरिया आणि बियाणांची कमतरता पडू नये, यासाठी संबंधित कंपन्यांकडून सदर कृषी निविष्ठा त्वरीत बोलवा, अशा सुचना जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी कृषी विभागाला दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, कृषी विकास अधिकारी पंकज बरडे आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, यवतमाळ जिल्ह्यासाठी नांदेड व चंद्रपूर येथे रॅक पॉईंट सुरू करण्यात आले आहे. या दोन्ही ठिकाणावरून खते आणि बियाणांची उचल होते का, अशी विचारणा त्यांनी केली. जिल्ह्यात युरियाची मागणी जास्त आहे. त्यामुळे थोड्या प्रमाणात तुटवडा जाणवत असला तरी मागणीनुसार सर्व आवंटन जिल्ह्याला प्राप्त होणार आहे. 30 जून पर्यंत पाच हजार मे.टन युरीया उपलब्ध होईल, असेही ते म्हणाले.

मारेगाव, झरी, वणी तालुक्यासाठी चंद्रपूर येथून, उमरखेड, महागाव, पुसद तालुक्यासाठी नांदेड येथून तर दारव्हा आणि पुसद तालुक्यासाठी वाशिम येथून खते उपलब्ध होत आहे. तसेच जिल्ह्यात बियाणांची कमतरता नाही, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. शेतकऱ्यांनी केवळ युरीयाचा वापर जास्त न करता मिश्र खतांचाही वापर करावा. जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाचे आगमन होईपर्यंत सोयाबीनची पेरणी करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

जिल्ह्यात आयपीएल कंपनीची एमओपी खताची 2500 मे. टनाची रॅक चालु आहे. आरसीएफ कंपनीची युरीया व 15 :15:15 खताची 2600 मे. टन रॅक, इफको कंपनीची 20:20:0:13 खताची 2600 मे. टन रॅक, कृभको कंपनीची युरीया खताची 2600 मे. टन रॅक, स्पीक कंपनीची युरीया व 20:20:0:13 खताची 2600 मे. टन रॅक, आयपीएल कंपनीची युरीया खताची 2600 मे. टन रॅक आणि कोरोमंडल कंपनीची युरीया खताची 2500 मे. टनाची रॅक पुढील आठ दिवसात उपलब्ध होणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी