आरोग्य सर्व्हे करण्यात निष्काळजीपणा करू नका



                     

v जिल्हाधिका-यांचे ग्रामस्तरीय व तालुकास्तरीय समितीला निर्देश

यवतमाळ, दि. 15 : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच प्राथमिक स्तरावर नागरिकांमधील कोव्हीड, सारी किंवा आयएलआय सदृष्य लक्षणे शोधण्यासाठी सर्व्हे करण्यात येत आहे. ग्रामस्तरावर किंवा तालुकास्तरावर हा सर्व्हे अतिशय काळजीपूर्वक होणे आवश्यक आहे. माणसाच्या जीवन-मरणाशी थेट संबंध असल्यामुळे सर्वे करतांना कोणताही निष्काळजीपण करू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी दिले.

नियोजन सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आर.पी.सिंह, कोरोना नियंत्रण समन्वयक डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. ही अतिशय चिंतेची बाब आहे. यासाठी प्रशासन दक्ष राहून काम करीत आहे. मात्र ग्रामस्तरावरील समित्यांनी केवळ थातुर-मातुर सर्वे करू नये. आरोग्य विभागाच्या पथकाने प्रत्येक घरी जाऊन कुटुंबातील प्रत्येकाची थर्मल स्कॅनर व पल्स ऑक्सीमीटरने तपासणी करावी. सर्दी, खोकला, ताप आणि श्वास घेण्यात त्रास असणारे रुग्ण तसेच आयएलआयची लक्षणे असणा-यांची अत्यंत काळजीपूर्वक तपासणी करा. नागरिकांमध्ये अशी लक्षणे आढळल्यास कोणताही विलंब न करता त्याची माहिती त्वरीत तालुका स्तरावरील आरोग्य यंत्रणेला द्या. सारी किंवा आयएलआयची लक्षणे असणा-या नागरिकांना जवळच्या कोव्हीट केअर सेंटर, कोव्हीड हेल्थ सेंटर किंवा कोव्हीड हॉस्पीटलला भरती करा. माणसाच्या जीवन मरणाचा प्रश्न असल्यामुळे स्वत:च्या कामाप्रती निष्ठा बाळगून काम करा.

पूर्वीपासून डायबिटीज, रक्तदाब, हायपर टेंशन अशा आरोग्य समस्या असलेल्या नागरिकांची तपासणी पुढील पाच-सहा महिने नियमित करावयाची आहे. दहा वर्षांखालील मुले आणि 50 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांवर लक्ष ठेवा. तसेच खाजगी डॉक्टरांकडे सारी किंवा आयएलआयची लक्षणे असलेले रुग्ण आल्यास त्याची माहिती डॉक्टरांनी त्वरीत आरोग्य विभागाला आणि शासकीय यंत्रणेला देणे आवश्यक आहे. जेणेकरून अशा रुग्णांवर वैद्यकीय महाविद्यालयात वेळेवर उपचार करणे शक्य होईल, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.

यावेळी डॉ. मिलिंद कांबळे म्हणाले, सर्वे करतांना घरी जाऊन कुटुंबातील व्यक्तिंची समोरासमोर विचारणा करा. सर्वे अचूक करा. लक्षणे आढळलेले रुग्ण त्वरीत वैद्यकीय महाविद्यालयात पाठवा. कोणत्याही दिरंगाईमुळे रुग्णाचा जीव जाऊ शकतो. त्यामुळे अतिशय गांभीर्याने सर्वे करा, अशा सुचना डॉ. कांबळे यांनी केल्या.

बैठकीला आरोग्य विभागाचे अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, तालुका स्तरावरील समितीचे सदस्य आदी उपस्थित होते.

००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी