पालकमंत्र्यांचा क्वॉरंटाईन कक्षातील नागरिकांशी संवाद




Ø दिग्रस येथील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी

यवतमाळ, दि. 28 : जिल्ह्यातील इतरही तालुक्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव झाल्यामुळे या तालुक्यांचा 'ऑनफिल्ड' आढावा घेण्यासाठी पालकमंत्री संजय राठोड विविध ठिकाणी भेट देत आहे. नेर, दारव्हा नंतर त्यांनी दिग्रस येथील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी केली. तसेच येथील कोव्हीड केअर सेंटर आणि समाजकल्याण विभागाच्या वसतीगृहात क्वॉरंटाईन असलेल्या नागरिकांशी त्यांनी संवाद साधला.

यावेळी बोलतांना पालकमंत्री म्हणाले, कोणत्याही प्रकारची काळजी करू नका. शासन -  प्रशासन आपल्या सोबत आहे. काही अडचण असेल तर त्वरीत सांगा. येथे जेवण कसे मिळते, स्वच्छता नियमित होते का, आदीबाबत त्यांनी आपुलकीने विचारणा केली. कोव्हीड केअर सेंटर तसेच क्वॉरंटाईनकरीता अधिग्रहीत केलेल्या इमारतींमध्ये नियमित स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे. येथील नागरिकांना मिळणा-या जेवणाबाबत कोणतीही तक्रार येऊ देऊ नका. आहाराबाबत विशेष काळजी घ्या, अशा सुचना त्यांनी केल्या.  तसेच दिग्रस शहरातील देवनगर या प्रतिबंधित क्षेत्राला भेट दिली असता येथील गरजवंतांना अन्नधान्य किट त्वरीत पुरवाव्या, असे निर्देश प्रशासनाला दिले.

शहरातील डॉक्टरांच्या प्रतिनिधी मंडळाशी बोलतांना पालकमंत्री म्हणाले, एक डॉक्टर अनेक रुग्णांसाठी आशेचा किरण असतो. पावसाळ्यात सर्दी - खोकल्याचे रुग्ण वाढतील तेव्हा रुग्णांची तपासणी करतांना डॉक्टरांनी स्वत:ची काळजी घेणे आवश्यक आहे. तर जिल्हाधिकारी एम.डी.सिंह म्हणाले, नागरिकांनी प्रशासनाच्या सुचना काटेकोरपणे पाळल्यास साथरोग पसरण्यास आळा बसेल.

दिग्रस येथील 295 नमुने तपासले असून यापैकी 22 रिपोर्ट पॉझेटिव्ह आले आहे. आतापर्यंत 12 जण उपचाराअंती बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. तर तालुक्यातील 145 जणांना क्वॉरंटाईन करण्यात आल्याची माहिती आढावा बैठकीत देण्यात आली.

यावेळी जि.प. अध्यक्षा कालिंदा पवार, जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, जिल्हा पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड, उपविभागीय पोलिस अधिकारी उदयसिंह चंदेल, तहसीलदार राजेश वजीरे आदी उपस्थित होते.

00000000


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी