नागरिकांच्या कल्याणासाठी नाविन्यपूर्ण कामांचे नियोजन करा - पालकमंत्री संजय राठोड


                               



                 

Ø ई-लायब्ररी, बायोटॉयलेट, नाट्यगृह प्रस्तावित

Ø सांडपाणी पुनर्वापरासाठी फिल्टरेशन प्लांट लावण्याच्या सूचना

यवतमाळ, दिनांक 28 : भविष्याचा वेध घेऊन नागरिकांना कायमस्वरूपी उपयोगी ठरतील अशा जनकल्याणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यास आपले प्राधान्य आहे. तसेच तालुकास्तरावर विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज ई-लायब्ररीच्या माध्यमातून विद्यार्थी उंचीचे नवे शिखर पादाक्रांत करू शकतील. त्यामुळे ई-लायब्ररी, बायोटॉयलेट, नाट्यगृह यासारख्या नाविन्यपूर्ण कामांचे अधिका-यांनी नियोजन करावे, अशा सुचना पालकमंत्री संजय राठोड यांनी दिल्या.

यवतमाळ येथील विश्रामगृहात नेर, दिग्रस आणि दारव्हा तालुक्यातील विकास कामांचा पालकमंत्र्यांनी आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी एम. डी. सिंह, बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता धनंजय चामलवार, कार्यकारी अभियंता चंद्रकांत मरपल्लीकर, खाजगी सचिव रवींद्र पवार, श्री. कारिया, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री यांच्यासह जिल्ह्यातील नगर परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवक-युवतींना अभ्यासाची सोय व्हावी, याकरीता तालुका स्तरावर चांगल्या दर्जाची ई - लायब्ररी उभारण्यात यावी, असे निर्देशित करून पालकमंत्री संजय राठोड म्हणाले, यवतमाळ शहरातील डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम ग्रंथालय विद्यार्थ्यांसाठी लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावे. बाहेर गावातून शहरात येणाऱ्या नागरिकांसाठी बाजारात व गर्दीच्या ठिकाणी सुलभ शौचालयाची आवश्यकता असते. यासाठी शहरातील मोक्याच्या ठिकाणी टॉयलेट घेऊन ते सामाजिक संघटनांमार्फत चालवण्यात यावे. नगर पालिकांनी कुठे कुठे शौचालये नाहीत व कुठे आवश्यकता आहे, याची माहिती दोन-तीन दिवसांत जिल्हाधिका-यांकडे सुपूर्द करावी. शहरातील नाल्यातून वाया जाणारे सांडपाण्यावर प्रक्रिया करून बांधकाम, बगीच्या सारख्या ठिकाणी या पाण्याचा पुनर्वापर करता येईल का, याबाबत देखील नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. नगर पालिका हद्दीतील नाले, घाणपाणी, अस्वच्छता याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

त्याचप्रमाणे नगर पालिकांनी नाट्यगृह व टाऊनहॉलची कामे हाती घ्यावी. दारव्हा,  दिग्रस या शहरातून नॅशनल हायवेचे बांधकाम सुरू होत असून त्यांच्यामार्फत शहरातील चौकाचे सौंदर्यीकरण करण्याबाबत तसेच शहराच्या प्रवेश मार्गाचे सौंदर्यीकरण करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. यावेळी त्यांनी धामणगाव (देव) येथील विकास कामांचासुध्दा आढावा घेतला. या तीर्थक्षेत्रावर सुंदर बगिचा बनविणे, सांडपाणी व्यवस्था युनिट, प्रत्येक घरासाठी जैवतंत्रज्ञानाने विकसीत युनिट आदींचे नियोजन करून हे तीर्थक्षेत्र मॉडेल स्वरुपात विकसीत करण्याचा आपला मानस आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी यवतमाळ शहरातील डॉ. एपीजे अब्दूल कलाम लायब्ररीची पाहणी करून या ठिकाणी उपलब्ध असलेल्या सोयीसुविधांची माहिती जाणून घेतली.

बैठकीला विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

0000000


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी