विभागीय आयुक्तांकडून कोव्हिडसह विविध विषयांचा आढावा




v कापूस खरेदी, पीककर्ज वाटप, नरेगा आदींचा समावेश

यवतमाळ, दि. 11 : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभुमीवर प्रशासनाच्या उपाययोजना तसेच खरीप हंगाम, येणारा पावसाळा आदी विषयाच्या अनुषंगाने अमरावती विभागाचे विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी विविध विषयांचा आढावा घेतला. यात कापूस खरेदी, पीक कर्ज वाटपाची सद्यस्थिती, नरेगाच्या कामांची उपलब्धता आदी विषयांचा समावेश होता.

नियोजन भवनात पार पडलेल्या या बैठकीला जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, जिल्हा पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, अपर जिल्हाधिकारी सुनील महिंद्रीकर, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे आदी उपस्थित होते.

पावसाळ्याला सुरवात होत आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सर्वांनी विशेष काळजी घ्यावी, असे सांगून विभागीय आयुक्त  म्हणाले, या कालावधीत सर्दी, खोकल्याचे प्रमाण दरवर्षीच वाढते. मात्र घाबरून जाऊ नये. त्वरीत वैद्यकीय सल्ला घ्यावा. प्रशासनानेही याबाबत विशेष उपाययोजना कराव्यात. आरोग्य विभागातील मनुष्यबळाच्या उपलब्धतेबाबत माहिती घेतांना ते म्हणाले, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाअंतर्गत येणारे काही कर्मचारी वैद्यकीय महाविद्यालयाला या परिस्थितीत उपलब्ध करून द्यावे. येथे व्हीआरडीएल प्रयोगशाळा सुरू झाल्यामुळे तांत्रिक पदे त्वरीत मंजूर करून द्यावी, अशी मागणी यावेळी अधिष्ठाता यांनी केली.

किटकनाशक फवारणी संदर्भात विभागीय आयुक्त म्हणाले, कोरोनामध्ये जशी काळजी नागरिकांनी घेतली तशीच काळजी फवारणीसंदर्भात शेतक-यांनी घ्यावी. फवारणी करणारे शेतकरी / शेतमजूर यांच्यामध्ये जनजागृती करून त्यांना संरक्षण किटचे महत्व समजावून सांगावे. कोणताही व्यक्ती फवारणीमुळे दगावणार नाही, याबाबत कृषी विभागाने आतापासून नियोजन करावे, अशा सुचना त्यांनी दिल्या.

जिल्ह्यात आतापर्यंत आलेल्या पॉझेटिव्ह रुग्णांपैकी सहा रुग्ण गंभीर होते. तर 85 टक्के लोकांना लक्षणे नव्हती. तसेच वैद्यकीय महाविद्यालयात 22 व्हेंटीलेटर उपलब्ध आहेत. जिल्ह्यात आतार्यंत दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला. जिल्ह्यात नरेगाची 2558 कामे सुरू असून 19866 मजूरांची उपलब्धता आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.

यावेळी विभागीय आयुक्तांनी महात्मा फुले जनआरोग्य योजना, मोफत धान्य वितरण, नवसंजीवनी योजना, कापूस खरेदी आढावा, पीक कर्ज वाटप, नरेगाच्या कामांची उपलब्धता, बोगस बियाणे विक्री संदर्भात करण्यात आलेली कारवाई, बियाणे व खतांची उपलब्धता आदींचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी सादरीकरण केले.

बैठकीला वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आर.पी. सिंह, कोरोना नियंत्रण समन्वयक डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब चव्हाण, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, जिल्हा उपनिबंधक रमेश काटके, प्र. जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीकांत देशपांडे, उपजिल्हाधिकारी (नरेगा) संगिता राठोड यांच्यासह इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी