कापूस खरेदीबाबत संवेदनशीलपणे विचार करा – पालकमंत्री राठोड



                                                                            

v डीडीआर, सीसीआय व फेडरेशनच्या अधिका-यांना नियोजनाचे निर्देश

यवतमाळ, दि. 12 : पावसाळ्याला सुरवात झाली आहे. अजूनही नोंदणी केलेल्या शेतक-यांचा कापूस खरेदी करणे बाकी आहे. त्यामुळे येत्या दहा दिवसांत शेतक-यांचा संपूर्ण कापूस खरेदी झाला पाहिजे. यासाठी जिल्हा उपनिबंधक, सीसीआय आणि कॉटन फेडरेशनच्या अधिका-यांनी अंतिम नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात कापूस खरेदीचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक रमेश कटके, सीसीआयचे प्रतिनिधी अजयकुमार, कॉटन फेडरेशनचे प्रतिनिधी श्री. महाजन, वनमंत्र्यांचे खाजगी सचिव रवींद्र पवार आदी उपस्थित होते.

कापूस खरेदीबाबत आता नोंदणी होणार नाही, असे सांगून पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले, जिल्हा उपनिबंधक, सीसीआय व कॉटन फेडरेशन यांनी समन्वय साधून कोणत्याही परिस्थतीत नोंदणीकृत शेतक-यांच्या घरातील कापूस खरेदी करावा. तालुका स्तरावरून उर्वरीत टोकनधारकांना संदेश द्यावा. नेर, दारव्हा, दिग्रस आणि आर्णी येथील जिनिंगमध्ये सीसीआयमार्फत खरेदी करण्यात येईल. जिल्ह्यात आज रोजी 17401 नोंदणीधारक शेतक-यांचा कापूस खरेदी बाकी आहे. यापैकी 8987 शेतक-यांचा कापूस सीसीआय तर उर्वरीत 8414 शेतक-यांचा कापूस फेडरेशनने कोणत्याही परिस्थतीत खरेदी करावा. तसेच टोकन वाटप यंत्रणेत गडबड होऊ देऊ नका. ठरवून दिलेल्या गाड्यांपेक्षा एकही गाडी कमी जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. जास्तीत जास्त कितीही गाड्या पाठविण्यास कोणताही आक्षेप नाही, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी चना आणि तूर खरेदीचाही आढावा घेतला.

यावेळी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह म्हणाले, पुढील दहा दिवस सर्व सहाय्यक निबंधकांनी नोंदणीधारक शेतक-यांना संदेश, ठरवून दिलेल्या गाड्यांचे नियोजन आदी कामे प्राधान्याने करावी. प्रत्येक जिनिंगवर किती शेतकरी येणार त्याचा दैनंदिन अहवाल 30 जूनपर्यंत नियमित सादर करावा. सीसीआयतर्फे खरेदी करण्यात येणा-या वणी येथील जिनिंगवर आर्णी आणि दारव्हा तालुक्यातून रोज किमान 100 गाड्या तर घाटंजी येथील जिनिंगवर नेर आणि दिग्रस तालुक्यातून रोज किमान 50 गाड्या गेल्याच पाहिजे. मात्र असे असले तरी सहाय्यक निबंधकांनी जास्तीत जास्त गाड्या पाठविण्याचे नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.

जिल्ह्यात कापूस खरेदीकरीता 52823 शेतक-यांनी नोंदणी केली असून सर्वेक्षणातून कपात झालेल्या कापूस उत्पादक शेतक-यांची संख्या 10732 आहे. त्यामुळे राहिलेल्या 42091 नोंदणीधारक शेतक-यांपैकी 24690 शेतक-यांचा कापूस सीसीआय आणि फेडरेशनमार्फत खरेदी करण्यात आला आहे. नोंदणी झालेल्यांपैकी 17401 शेतक-यांचा कापूस खरेदी करणे बाकी आहे. यात सीसीआयमार्फत 5620 तर कॉटन फेडरेशनमार्फत 11781 शेतकरी बाकी आहे. मात्र पालकमंत्री यांनी पुढाकार घेऊन त्वरीत कापूस खरेदी होण्यासाठी 17401 नोंदणीधारक शेतक-यांपैकी 8987 शेतक-यांचा कापूस सीसीआय आणि 8414 शेतक-यांचा कापूस फेडरेशन खरेदी करणार आहे.

बैठकीला जिल्हा पणन अधिकारी अर्चना माळवे यांच्यासह सर्व सहाय्यक निबंधक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी