प्रत्येक तालुक्यातून जास्तीत जास्त नमुने तपासणीकरिता पाठवा -- जिल्हाधिकारी सिंह


                            


              

संशयीतांची टेस्ट निगेटीव्ह आल्यास कोवीड सेंटरमधून लगेच सुटी

यवतमाळ, दि.30 : जिल्ह्यात प्लाझ्मा थेरीपीसाठी प्लॉझ्मा संकलनाची सुरूवात करण्यात आली आहे. तसेच कोरोना विषाणु नमुन्यांची तपासणी जलद होण्यासाठी जिल्ह्यात अजून एक टेस्टींग मशीन घेण्यात येणार आहे. मात्र प्रत्येक तालुक्यातून नमुने संकलनाला गती देण्यात यावी व रोज कमीत कमी 25 किंवा त्यापेक्षा जास्त नमूने  तपासणीला पाठवावे,  अशा सूचना जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी दिल्या.

नियोजन सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर जिल्हाधिकारी सुनिल महेंद्रीकर, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.आर.पी. सिंग, कोरोना नियंत्रण समन्वयक डॉ. मिलींद कांबळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे प्रामुख्याने उपस्थित होते.  

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले कोरोना पॉझीटीव्ह व्यक्तीच्या प्रत्यक्ष संपर्कात न आलेले तथापि केवळ संपर्काचा संशय म्हणून कोवीड केअर सेंटरमध्ये भरती असलेल्या को-मॉरबीड (पुर्वीपासून व्याधींनी ग्रस्त असलेले) नागरिकांचे कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आले तरी त्यांना 7 दिवस कोवीड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात येत होते. आता मात्र त्यांना कोवीड सेंटरमधून लगेच सुटी देण्याबाबत निर्णय घ्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी सिंह यांनी दिले.

यावेळी पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी कोवीड केअर सेंटरमध्ये हाय रिस्क व लो रिस्क चे सर्व रुग्ण एकाच ठीकाणी ठेवण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये कोवीड केअर सेंटरमध्ये भरती होण्यास भीती आहे, असे निदर्शनात आणून दिले असता जिल्हाधिकारी सिंह यांनी सर्व कोवीड केअर सेंटरमध्ये हाय रिस्क, लो रिस्क नुसार वर्गीकरण करून नागरिकांना सुरक्षीत अंतराने वेगवेगळ्या मजल्यावर ठेवण्याच्या सुचना केल्या.

            शासनाच्या नवीन निर्देशानुसार जिल्हाधिकाऱ्यांना जिल्ह्यात लॉकडाऊनचे सर्व अधिकार देण्यात आले आहे. नियम न पाळणाऱ्या नागरिकाना स्वयंशिस्तीची जाणीव करून द्यावी व आवश्यकता पडल्यास दंडात्मक कार्यवाही करावी. तसेच  अत्यावश्यक सेवा सुरूळीत राहील याकडे लक्ष देण्याचही त्यांनी सांगीतले.

तत्पुर्वी अधिष्ठाता आर.पी.सिंग यांनी बरे झालेल्या रुग्णांना प्लास्माथेरेपी साठी प्लास्मा देण्यास प्रोत्साहीत करण्यात यावे असे सांगितले. तर जिल्ह्याचे कोरोना नियंत्रण समन्वयक डॉ. मिलींद कांबळे यांनी कोरोना रुग्ण गंभीर स्थीतीत जाण्यापुर्वी त्यांना हॉस्पीटला आणले तर मृत्यू दर निश्चित कमी करता येईल असे ते म्हणाले.

बैठकीचे सादरीकरण निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे यांनी केले.

यावेळी कोरोना ॲक्टीव्ह पॉझीटीव्ह रुग्ण असलेल्या तालुक्यातील उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, तालुका आरोग्य अधिकारी, नगरपालीकांचे मुख्याधिकारी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.  

०००


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी