प्रतिबंधित क्षेत्रात जिल्हाधिकारी 'ऑनफिल्ड'




v दोन दिवसांत महागाव, नागापूर, दिग्रस येथे भेटी

v ग्रामस्तरीय आणि तालुकास्तरीय समितीचा दैनंदिन आढावा

यवतमाळ, दि. 06 : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव शहरातून ग्रामीण भागाकडे होत असल्याने जिल्हा प्रशासनाने या भागात अनेक उपाययोजना केल्या आहेत. या उपाययोजनांची शासकीय यंत्रणेद्वारे प्रत्यक्ष अंमलबजावणी होते की नाही, तसेच येथील नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत काय काळजी घ्यावी, यासाठी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी स्वत: पुढाकार घेतला आहे. याच अनुषंगाने जिल्हाधिकारी प्रतिबंधित क्षेत्रात 'ऑनफिल्ड' असून गत दोन दिवसांत त्यांनी महागाव, नागापूर, दिग्रस आदी ठिकाणी भेटी दिल्या.

दिग्रस तालुक्यातील इसापूर, रुईतलाव, मरसूळ या तीन गावांतून कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने प्रशासनाने हा भाग प्रतिबंधित केला आहे. या प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी करून जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी गावक-यांशी संवाद साधला. यावेळी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील महिंद्रीकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब चव्हाण, उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड आदी उपस्थित होते.

प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांची थर्मल स्कॅनर आणि पल्स ऑक्सीमीटर या उपकरणांच्या सहाय्याने आरोग्य तपासणी केली जाते की नाही, याबाबत जिल्हाधिका-यांनी स्वत: खात्री करून घेतली. या क्षेत्रात विशेष काळजी घेऊन स्वच्छता ठेवावी, यात कोणताही हलगर्जीपणा करू नका, असे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले. गावक-यांशी संवाद साधतांना ते म्हणाले, नागरिकांनी अनावश्यकपणे बाहेर पडून नये. बाहेर पडल्यास नियमितपणे मास्कचा वापर करावा. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वारंवार हात धुवावे. तसेच मानवी साखळी तोडण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करणे आवश्यक आहे. गावात कोणालाही सर्दी, ताप, खोकला किंवा श्वसनाचा त्रास असेल तर त्यांनी त्वरीत जवळच्या फिवर क्लिनीमध्ये जाऊन तपासणी करून घ्यावी. यात नागरिकांनी कोणताही निष्काळजीपणा करू नये.

आरोग्य तपासणी करणा-या पथकाने थर्मल स्कॅनर आणि पल्स ऑक्सीमीटरद्वारे नागरिकांची तपासणी करून त्याच्या नोंदी ठेवाव्यात. तसेच पुढील 14 दिवस प्रत्येकाच्या आरोग्यावर बारीक लक्ष ठेवून नागरिकांची विचारपूस करावी, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी केल्या. याशिवाय गावक-यांच्या दैनंदिन समस्या, खरीपाची तयारी, पेरणीचे नियोजन, पीक कर्ज आदींबाबत त्यांनी माहिती जाणून घेतली. तसेच तालुकास्तरीय कोरोना सनियंत्रण समितीची बैठक घेऊन पुढील काळात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना व घ्यावयाची काळजी आदींबाबत मार्गदर्शन केले. गावागावात मनरेगा अंतर्गत कामे मंजूर करून जास्तीत जास्त मजुरांना कामे उपलब्ध करून द्यावे. सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत नागरिकांना मोफत धान्य वाटप त्वरीत करावे, असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराग जैन, उदय चंदेल, दिग्रसचे तहसीलदार राजेश वजीरे, गटविकास अधिकारी रमेश खारोडे, शिवाजी गवई आदी उपस्थित होते.

गत दोन महिन्यांपासून जिल्हाधिकारी एम.डी.सिंह दररोज जिल्हाधिकारी कार्यालयातील व्हीसीच्या माध्यमातून गावस्तरीय व तालुकास्तरीय समितीकडून दैनंदिन कामाचा आढावा घेत आहे. यात कोरोनासंदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजना, मनरेगा, सार्वजनिक वितरण प्रणाली, नियमित आरोग्य तपासणी मोहीम, फिवर क्लिनीक, ग्रामस्तरीय समित्यांनी करावयाची कामे, बियाणे-खते उपलब्धता, पीक कर्जवाटप आदी विषयांचा समावेश असतो. विशेष म्हणजे जिल्हाधिका-यांच्या दैनंदिन आढाव्यामुळे ग्रामस्तरीय यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. यवतमाळ जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी पालकमंत्री संजय राठोड आणि जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांच्या मार्गदर्शनात प्रशासनाच्यावतीने 'पॉझेटिव्ह' धडपड सुरू आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी