शाळा सुरु करण्यासंदर्भात शासन निर्णयाप्रमाणे कार्यप्रणाली तयार करा




v जिल्हाधिका-यांच्या गटशिक्षणाधिका-यांना सुचना

यवतमाळ, दि. 22 : चालू शैक्षणिक वर्षात शाळा सुरू करण्यास विलंब होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी, सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छता, मास्कचा वापर आदी बाबींची अंमलबजावणी अतिशय महत्वपूर्ण आहे. याबाबत शासनाने 28 एप्रिल आणि 15 जून रोजी शासन निर्णय निर्गमित केला असून त्याप्रमाणेच कार्यप्रणाली तयार करावी, अशा सुचना जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिका-यांना दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात शाळा सुरू करण्यासंदर्भात सर्व तालुक्यांचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. बैठकीला जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, शिक्षणाधिकारी डी.आर.चवणे आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देऊन जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिका-यांनी आपापल्या क्षेत्रानुसार एसओपी तयार करावी, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, शाळेत स्वच्छता, आहार, शिक्षण आणि शारीरिक व्यायाम यावर फोकस ठेवावा. तसेच विद्यार्थ्यांसाठी हॅन्डवॉश, साबण, मास्कचा वापर, सोडीयम हायड्रोल्कोरीनने फवारणी आदी बाबी प्राधान्याने करून घ्याव्या. विद्यार्थ्यांचे हात व त्यांचा गणवेश स्वच्छ असण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करावी. प्रत्येक शाळेत तीन –तीन महिने पुरेल एवढे हॅन्डवॉश, साबण, सॅनिटायझर आदींचे नियोजन करावे. नियमित अभ्यासक्रमापेक्षा रोज 30 मिनिटे विद्यार्थ्यांना योगा, शारीरिक व्यायाम आदींसाठी प्रोत्साहित करा. ताप किंवा सर्दी किंवा खोकला असलेल्या विद्यार्थ्याला शाळेत येऊ देऊ नका. अशा विद्यार्थ्यांना पालकांनी घरीच ठेवावे. तसेच शिक्षकांनी याबाबत ग्रामस्तरीय समितीला माहिती देऊन तीन दिवस त्याच्यावर लक्ष ठेवावे. एसपीओटू, पल्स ऑक्सीमीटरने संबंधित विद्यार्थ्याची तपासणी करावी.

प्रत्येक शाळेने लहान मुलांसाठी येणारे पल्स ऑक्सीमीटर खरेदी करावे. विद्यार्थ्यांना एका दिवसाआड शाळेत बोलावून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन होणे आवश्यक आहे. शिक्षकांनी स्वत:चे आरोग्य चांगले ठेवावे. तसेच ग्रामीण भागातील शाळेत विद्यार्थ्यांना आहार बनवून न देता फूड पॅकेट देता येईल का, याबाबत नियोजन करावे. शाळा सुरू करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसला तरी प्रतिबंधित क्षेत्रात शाळा सुरू राहणार नाही. प्रतिबंधित क्षेत्र वगळता त्या शहरातील इतर भागात शाळा सुरू होऊ शकतात. मात्र प्रतिबंधित भागातून कोणताही विद्यार्थी किंवा शिक्षक शाळेत येता कामा नये, याकडे गांभिर्याने लक्ष द्यावे. सर्व गटशिक्षाधिका-यांनी शाळा व्यवस्थापन समितीची बैठक त्वरीत घ्यावी. शहरातील खाजगी शाळांचीसुध्दा बैठक शिक्षणाधिका-यांनी बोलवावी, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी केल्या.

यावेळी सर्व तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते.

०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी