जिल्ह्यात पुन्हा एक बालविवाह थांबविण्यात यश


यवतमाळ, दि. 16 : जिल्ह्यात नुकतेच दोन बालविवाह थांबविण्यात आले होते. आता पुन्हा नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणखी 15 वर्षीय बालिकेचा बालविवाह थांबविण्यात यश आले आहे.  

जिल्हा बाल संरक्षण कक्षाला मारेगाव येथील पोलिस निरीक्षक जगदीश मंडलवार यांनी तालुक्यातील कुंभा येथे बालविवाह होत असल्याची माहिती दिली. त्यानंतर तत्परतेने मुलीचे वय निश्चित करून तालुकास्तरीय यंत्रणेला याबाबत कळविण्यात आले. पोलिस यंत्रणा, पंचायत समिती विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, ग्रामसेवक, पोलिस पाटील, अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांनी प्रत्यक्ष गावात भेट दिली. सर्वांनी संबधित कुटुंबातील मुलगी ही 18 वर्षापेक्षा कमी वयाची असल्याने तिचा नियोजित होणारा विवाह बेकायदेशीर असल्याचे सांगितले.

यावेळी संबंधितांना बालविवाहाचे दुष्परिणाम व बालविवाह कायद्याबाबत माहिती सांगून त्यामध्ये नमुद असलेल्या शिक्षेची व कारवाईची माहिती देण्यात आली. त्यामुळे मुलीच्या आई -वडीलांनी नियोजित विवाह रद्द केला. तसेच आम्ही मुलीचे 18 वर्षे पूर्ण झाल्यावरच लग्न करू अशी हमी दिली. वरील कार्यवाही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अर्चना इंगोले व पोलिस निरीक्षक जगदिश मंडलवार यांच्या मार्गदर्शनात पार पडली. यावेळी पोलिस कर्मचारी रवींद्र गुप्ता, संरक्षण ‍ अधिकारी अविनाश पिसुर्डे, आकाश बुर्रेवार, उपसरपंच कल्पना चौधरी, ग्रामसेवक सुनील ताटेवार,  ‍अंगणवाडी सेविका प्रतिभा नागभिडकर, मीना मांदाडे, कोतवाल उत्तम आत्राम, प्रभाकर चांदेकर, पोलीस पाटील रामचंद्र मेश्राम व  प्रतिष्ठीत नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यवाही पार पडली.

नागरिकांना बाल विवाहाबाबत माहिती मिळाल्यास त्यांनी जिल्हा बाल संरक्षण कक्ष किंवा चाईल्ड लाईन -1098 या दुरध्वनी क्रमांकावर कळविण्याचे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर यांनी केले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी