परिस्थितीवर नियंत्रणासाठी सलग चवथ्या दिवशी जिल्हाधिकारी दारव्हात




यवतमाळ, दि. 18 : दारव्हा येथे मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याने परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व प्रतिबंधित क्षेत्राचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह दररोज दारव्हात दाखल होत आहे. आज (दि.18) सलग चवथ्या दिवशी जिल्हाधिका-यांनी प्रतिबंधित क्षेत्रात भेट दिली. यावेळी अतिरिक्त पोलिस अधिक्षक नुरुल हसन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब चव्हाण, उपविभागीय अधिकारी इब्राहीम चौधरी आदी उपस्थित होते.

दारव्हा येथे आतापर्यंत पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या एकूण 20 झाली असून यापैकी सद्यस्थितीत ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह 17 आहेत तर तीन जणांचा मृत्यु झाला आहे. ही परिस्थतीत हाताबाहेर जाऊ नये व कोरोनाचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरू नये, यासाठी जिल्हाधिकारी दारव्हात तळ ठोकून आहेत. शहरातील इनामदारपूरा, फटीगपूरा, शिवाजी नगर, टिळकवाडी या प्रतिबंधित क्षेत्राचा त्यांनी आढावा घेतला.

विशेष म्हणजे प्रतिबंधित क्षेत्रात नागरिकांच्या हालचालीवर नियंत्रणासाठी जिल्ह्याचे अतिरिक्त पोलिस अधिक्षक नुरुल हसन यांना येथे नियुक्त करण्यात आले आहे. उपजिल्हाधिकारी (महसूल) श्री. दळवी यांना इंसिडंट कमांडर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तर एमबीबीएस (एमडी) असलेले जिल्हा मुख्यालयातील तहसीलदार डॉ. संतोष डोईफोडे यांना दारव्हाचे तहसीलदार म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. यवतमाळ शहरातील इंदिरा नगर, जाफर नगर, मेमन सोसायटी येथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिशय परिश्रम घेणारे अकोलाबाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बेग मिर्झा खालिद सुजाद हे आता दारव्हाचे तालुका आरोग्य अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत   जिल्हाधिका-यांना देण्यात आलेल्या विशेष अधिकारानुसार या सर्व नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक, अतिरिक्त पोलिस अधिक्षक असे वरिष्ठ अधिकारी थेट दारव्हामध्ये ‘ऑनफिल्ड’ आहेत. तसेच येथे नागरिकांचा आरोग्य सर्व्हे करण्यात येत आहे. मात्र या सर्व्हेमध्ये स्थानिक कर्मचारी अनुपस्थितीत असल्याचे निदर्शनास आले आहे. सर्व्हे दरम्यान अनुपस्थित असलेल्या अशा 14 शिक्षकांवर कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री संजय राठोड व जिल्हाधिकारी सिंह यांनी स्थानिक प्रशासनाला दिले आहे. तसेच दिलेल्या जबाबदारीतून पळ काढणा-यांविरुध्द यापुढेही साथरोग नियंत्रण कायदा 1897, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 नुसार कडक कारवाई करण्यात येईल, असा निर्णय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आल्याचे जिल्हाधिका-यांनी सांगितले.

 

शहरातील इनामदारपुरा भागात 873 कुटुंब असून येथील लोकसंख्या 4473 आहे. या भागासाठी दोन फिवर क्लिनीक सुरू करण्यात आले आहे. तसेच नागरिकांची नियमित तपासणीकरीता तीन वैद्यकीय अधिका-यांच्या मार्गदर्शनात 30 टिमचे गठन करण्यात आले असून यावर नियंत्रणासाठी पाच सुपरवायझर नेमण्यात आले आहे. शिवाजी नगर येथे कुटुंबाची संख्या 201 आहे. येथील 847  लोकसंख्येकरीता एक फिवर क्लिनीक आहे. येथील नागरिकांच्या तपासणीकरीता एका वैद्यकीय अधिका-याच्या नियंत्रणात आठ आरोग्य टिम कार्यरत आहे. तर टिळकवाडी येथे 150 कुटुंब असून या भागाची लोकसंख्या 850 आहे. येथील नागरिकांच्या तपासणीकरीता दोन सुपरवायझर व एका वैद्यकीय अधिका-याच्या नेतृत्वात आरोग्य विभागाच्या नऊ टीम तयार करण्यात आल्या आहेत. येथे एक फिवर क्लिनीक आहे. दारव्हा येथील तीन कोव्हीड केअर सेंटर व एका कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये 220 जण दाखल करण्यात आले आहे. तसेच यवतमाळ येथील कोव्हीड केअर सेंटरमध्ये दारव्हातील जवळपास 325 नागरिकांना भरती आहे. यात अगदी निकटच्या संपर्कातील (हाय रिस्क काँटॅक्ट), जवळच्या संपर्कातील (लो रिस्क काँटॅक्ट), पुर्वीपासून अनेक आजारांनी ग्रस्त असलेले व गर्भवती महिलांचा समावेश आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी