आणखी एका पॉझेटिव्ह रुग्णाची भर.... जिल्हाधिकारी दारव्हा आणि नेरच्या प्रतिबंधित क्षेत्रात



यवतमाळ, दि. 20 : यवतमाळ शहरातील रहिवासी असलेल्या रुग्णाचा रिपोर्ट पॉझेटिव्ह आल्याने पॉझेटिव्ह रुग्णाच्या संख्येत एकने वाढ झाली आहे. 48 वर्षीय या व्यक्तीचा रिपोर्ट आज (दि. 20) पॉझेटिव्ह प्राप्त झाला. जिल्ह्यात सद्यस्थितीत ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 52 झाली असून वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात 35जण भरती आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 215 आहे. यापैकी 156 जण बरे होऊन घरी गेले आहेत. तर सात कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे. आज प्राप्त एकूण 235 रिपोर्टपैकी एक पॉझेटिव्ह तर 229 रिपोर्ट निगेटिव्ह आहेत. पाच नमुन्यांचे अचूक निदान न झाल्याने सदर नमुने पुन्हा तपासण्यात येणार आहे. निगेटिव्ह आलेल्या रिपोर्टमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पाच रिपोर्ट, कोव्हीड केअर सेंटरमधील 72, यवतमाळच्या संस्थात्मक विलगीकरण कक्षातील सहा, दारव्हा येथील 46, नेर येथील 65, दिग्रस येथील 22 आणि पुसद येथील 13 रिपोर्टचा समावेश आहे.

वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत 3363 नमुने तपासणीकरीता पाठविले असून यापैकी 3323 प्राप्त तर 40 अप्राप्त आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 3108 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे.

          जिल्हाधिका-यांची दारव्हा आणि नेर येथील प्रतिबंधित क्षेत्राला भेट : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी या भागावर लक्ष केंद्रीत केले आहे. जिल्हाधिकारी रोज प्रतिबंधित क्षेत्रात दाखल होऊन येथील परिस्थतीवर गांभिर्याने लक्ष देत आहे. शनिवारी त्यांनी दारव्हा आणि नेर येथील प्रतिबंधित क्षेत्राला भेट देऊन आढावा घेतला.

             आतापर्यंत दारव्हा येथे सात पॉझेटिव्ह रुग्णांच्या अगदी निकटच्या संपर्कातील 32 जण पॉझेटिव्ह आले आहेत. तर येथील 178 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आहे. पॉझेटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील आणखी 200 जणांचे नमुने तपासणीकरीता पाठविण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहे. तसेच संपर्कातील जवळपास 400 लोकांना पाच ठिकाणच्या कोव्हीड केअर सेंटरमध्ये दाखल करावे, अशाही सुचना त्यांनी दिल्या. विशेष म्हणजे आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत जिल्हाधिका-यांना प्राप्त अधिकारानुसार त्यांनी दारव्हा येथे नवीन टीम कार्यरत केली आहे. यात उपविभागीय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी (महसूल) श्री. दळवी, तहसीलदार म्हणून डॉ. संतोष डोईफोडे, तालुका आरोग्य अधिकारी म्हणून डॉ. बेग तसेच श्री. चंदेल आणि श्री केदार यांचा समावेश आहे. ही टीम 24 बाय 7 कार्यरत राहून येथे काम करणार आहे.

            ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांनी आवश्यक काळजी घ्यावी. सर्व शासकीय यंत्रणा नागरिकांच्या आरोग्यासाठी अहोरात्र झटत आहे. त्यामुळे नागरिकांनीसुध्दा शासन-प्रशासनाच्या सर्व सुचनांचे पालन करणे अनिवार्य आहे. स्वत:च्या व इतरांच्या आरोग्याच्यादृष्टीने नागरिकांनी विनाकारण घराच्या बाहेर पडू नये. गर्दी टाळावी. तसेच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करावे. अत्यावश्यक वस्तुंच्या खरेदीकरीता बाहेर जायचे असल्यास मास्कचा वापर करावा. वारंवार साबणाने हात स्वच्छ धुवावे. सॅनिटायझरचा वापर करावा. नागरिकांच्या सहकार्याशिवाय कोरोनविरुध्दची लढाई जिंकणे शक्य नाही, त्यामुळे सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले आहे.  

०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी