नवरात्रोत्सवात महिलांच्या आरोग्य तपासणीसाठी ‘माता सुरक्षित, तर घर सुरक्षित अभियान’ 18 वर्षावरील 100 टक्के महिलांची आरोग्य तपासणी व्हावी यासाठी सुक्ष्म नियोजन करा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या सूचना

यवतमाळ, दि. 23 सप्टेंबर (जिमाका):- नवरात्र उत्सवादरम्यान ‘माता सुरक्षित, तर घर सुरक्षित’ या शासनाच्या अभियानांतर्गत जिल्ह्यात 18 वर्षांवरील 100 टक्के महिला, माता, गर्भवती यांची आरोग्य तपासणी करून प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य यंत्रणेने सुक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले असून जिल्ह्यातील सर्व महिलांनी या अभियानाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. जिल्हा आरोग्य समितीच्या नियोजन मंडळाची सभा जिल्हाधिकारी अमोले येडगे यांच्या अध्यक्षतेखाली काल घेण्यात आली. याप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.आर.डी.राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पी.एस.चव्हाण, जिल्हा माता व बाल संगोपान अधिकारी डॉ.पी.एस.ठोंबरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात, वैद्यकीय अधिकारी डॉ. तन्वीर शेख, डॉ. रमा बाजोरिया, महाआयटीचे जिल्हा समन्वयक फिरोज पठाण, विस्तार अधिकारी (शिक्षण) राजू मडावी तसेच दूरदृष्य प्रणालीद्वारे सर्व तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिक्षक उपस्थित होते. या अभियानात सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत 18 वर्षांवरील महिलांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. प्रा‌थमिक आरोग्य केंद्रात दररोज माता व महिलांच्या तपासणीची शिबीरे घेण्यात येतील. उपकेंद्र व आरोग्यवर्धिनी केंद्र स्तरावर आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत मातांची तपासणी, समुपदेशन कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. ग्रामीण रुग्णालय आणि त्यावरील रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञांमार्फत तपासणी करण्यात येणार आहे. या कालावधीत मानवविकास कार्यक्रमांतर्गत तज्ज्ञांची शिबिरे देखील आयोजित करण्यात येणार आहेत. यासाठी आवश्यकतेनुसार तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवा घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. तसेच पांढरकवडा उपविभागात आदिवासी महिलांची लोकसंख्या जास्त आहे तेथे सर्व महिलांची आरोग्य तपासणी होण्यासाठी विशेष लक्ष देण्याची त्यांनी सांगितले. या अभियानात महिलांच्या वजन, उंची, हिमोग्लोबिन, रक्तातील साखरेचे प्रमाण याबाबतच्या चाचण्या घेण्यात येतील. आवश्यक वाटल्यास रक्ताच्या चाचण्या, छातीचे एक्सरे आणि इतर चाचण्या केल्या जाणार आहेत. कर्करोग, रक्तदाब, मधुमेह याबाबत चाचणी घेतली जाईल. माता आणि बालकांच्या नियमित लसीकरणाची तपासणी केली जाणार आहे. पोषण, बीएमआय आटोक्यात ठेवण्याबाबत तसेच, मानसिक आरोग्य, स्तनपान, व्यसनमुक्ती याबाबत समुपदेशन केले जाणार आहे. महिलांच्या आरोग्य तपासणीसोबतच लहान बालकांची आरोग्य तपासणी तसेच त्यांना कोणत्या लस देणे आवश्यक आहे याबाबत जनजागृती करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. प्रधानमंत्री मातृवंदन योजने अंतर्गत नाव व पत्यात बदल झालेल्या गरोदर मातांची नोंदणी करतांना अडचण येवू नये यासाठी या अभियान कालावधीत त्यांचे आधार कार्ड अद्यावत करण्यासाठी विशेष शिबीर घेण्याचेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले. सध्या शासनामार्फत सेवा पंधरवाडा अभियान सुरू असून त्याअंतर्गत प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजनेचे ओळखपत्र, दिव्यांग ओळखपत्र व प्रमाणपत्र, युनिक आयडी, मातृवंदन योजनेचे प्रमाणपत्र वितरण तसेच कोविड लसिकरण आदि आरोग्य सेवांचा लाभ नागरिकांना देण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्याचे त्यांनी सांगितले. प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या नागरिकांना पाच लाख रुपयांपर्यत मोफत उपचार दिल्या जातात, नागरिकांना याचे ओळखपत्र बनविण्यासाठी 30 रुपयांपर्यत येणाऱ्या खर्चात ग्रामपंचायतींनी या अभियान कालावधीत योगदान देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. ‘माता सुरक्षित, तर घर सुरक्षित’ अभियान यशस्‍वी करण्यासाठी आरोग्य सेवेशी संबंधित संघटना, अशासकीय संस्था, शासकीय कार्यालयांची मदत घ्यावी. मोहिमेतील उपक्रमांचा जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळावा, यासाठी गावात दवंडी देणे, विविध माध्यमातून जनजागृती करणे, आशा अंगणवाडी व आरोग्य सेविका-सेवकांमार्फत घरोघरी माहिती देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. माता बाल संगोपान अधिकारी डॉ. पी.एस.ठोंबरे यांनी अभियानाची माहिती सादर केली. कार्यक्रमाला आरोग्य यंत्रणा व इतर विभागाचे संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी