अतिवृष्टीग्रस्तांसाठी 536 कोटी मदतनिधी तहसिलदारांकडे वितरित कर्जकपात न करता मदत निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे निर्देश

यवतमाळ, दि. 21 सप्टेंबर (जिमाका) :- अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी प्राप्त झालेला मदत निधी थेट त्यांच्या बँक खात्यात तातडीने जमा करण्याचे व त्यातून कोणतीही कर्जाची रकम कपात न करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सर्व तहसिलदार व बँक व्यवस्थापक यांना दिले आहे. माहे जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसान-भरपाईसाठी जिल्ह्यास वाढीव दराने 529 कोटी 98 लाख 79 हजार रुपये आणि खरडून गेलेल्या व गाळ साचल्याने बाधीत झालेल्या शेत जमीनीसाठी 6 कोटी 5 लक्ष 16 हजार रुपये असा एकूण 536 कोटी तीन लक्ष 95 हजार रूपये मदत निधी यवतमाळ जिल्ह्याला प्राप्त झाला होता. तो निधी सर्व तहसिलदार यांना अर्थसंकल्पिय प्रणालीवर वितरीत करण्यात आला आहे. सदर मदत निधीचे देयके तातडीने पारीत करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी कोषागार अधिकारी यांना दिल्या आहेत. तहसिलदार यांनी उपरोक्त निधीचे नुकसानग्रस्तांना वाटप करतांना शासन निर्णयातील विहीत अटी व शर्तीची पुर्तता होत असल्याची खात्री करावी, लाभार्थी निश्चित झाल्यानंतर वित्तीय शिस्तीच्या दृष्टीकोनातून प्रत्यक्ष गरजेनुसारच कोषागारातून रक्कम आहरित करून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट ऑनलाईन पध्दतीने हस्तांतरित करण्यात यावी. सदर निधी अनावश्यकरित्या कोषागारातून आहरित करून बँक खात्यामध्ये काढून ठेवण्यात येवू नये. तसेच लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशिल जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्याच्या सूचना देखील जिल्हाधिकारी यांनी संबंधीत तहसिलदार यांना दिल्या आहेत.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी