सैनिकांच्या कार्यातून प्रेरणा घेत देशाला महासत्ता बनविण्याचा संकल्प करा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे युवकांना आवाहन सर्जीकल स्ट्राईक वर्धापन दिन व माजी सैनिक मेळावा संपन्न

यवतमाळ दि. 29 सप्टेंबर (जिमाका) : देशाचे सैनिक हे कठीन भौगोलीक क्षेत्रात व विपरीत परिस्थितीत देखील आपल्या शिस्तीच्या बळावर व देशासाठी त्यागाच्या भावनेतून आपले रक्षण करत असतात, त्यामुळे आपण आपले काम शांततेने करत असतो. त्यांच्यामुळे देशाला लाभलेल्या शांतता व सुरक्षेच्या वातावरणात देश विकासाकडे अग्रेसर आहे. आज शौर्य दिनानिमित्त सैनिकांचे देशाच्या विकासात असलेल्या योगदानाबाबत कृतज्ञता व्यक्त करून व त्याचेपासून प्रेरणा व स्फुर्ती घेवून देशाला महासत्ता बनविण्याचा संकल्प करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. भारतीय सैन्याने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा वर्धापन दिन शौर्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो. शौर्य दिन व माजी सैनिक मेळाव्याचा कार्यक्रम जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली आज शासकीय तंत्रनिकेतनच्या श्रोतृगृहात घेण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कवाली, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे, कॅप्टन दिनेश तत्ववादी याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते. सैनिकांच्या कल्याणाकरिता त्यांचे परिवारासाठी घरकुल योजना, जमीन वाटप, प्रवास सवलत, रोजगार, पाल्याचे शिक्षण आदि बाबीमध्ये विविध शासकीय निधीतून मदत करण्यात व सैनिकांना सहकार्य करण्यास प्रशासन कटिबद्ध असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. जिल्ह्यात सुजान समाज घडावा व तरूणांमध्ये शिस्त राहावी यासाठी सैनिकांच्या प्रेरणादायी शौर्यगाथा विद्यार्थ्यांपुढे ठेवण्याचे काम प्रशासनातर्फे करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी ज्या देशाच्या सीमा सुरक्षीत असतात तेच देश प्रगती करतात असे सांगून देशाची सुरक्षा सांभाळणाऱ्या सैनिकांसोबत आय.ए.एस. प्रशिक्षणादरम्यान सिमेवर व्यतीत केलेल्या आठवणी सांगितल्या. युवा विद्यार्थ्यांनी सैनिकांच्या पराक्रमाच्या गोष्टींचे वाचन करावे व त्यातून प्रेरणा घेत देशाच्या प्रगतीत सहभाग नोंदविण्याचे सांगितले. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ललीलकुमार वऱ्हाडे यांनी जम्मू काश्मिरच्या उरी भागात भारतीय सैन्यावरील भ्याड हल्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैनिकांनी पाकिस्तानमध्ये 29 सप्टेंबर या दिवशीच सर्जिकल स्ट्रॉईक करून वचपा घेतला, त्याचा वर्धापन दिन साजरा करण्यात येत असल्याचे सांगितले. सर्जीकल स्ट्राईक हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनितीचा भाग असल्याचे त्यांनी सांगितले. देश घडविण्यासाठी आपण आपले काम प्रामाणिकपणे करण्याचा संदेश त्यांनी दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी बालाजी शेंडगे यांनी तर कार्यक्रमाचे संचालन यशवंत देशमुख यांनी केले. याप्रसंगी राणी लक्ष्मीबाई शाळेच्या चमूने स्वागत गीत सादर करून अतिथींचे स्वागत केले. कार्यक्रमात उपस्थित वीर माता व वीर पत्नी अंजनाबाई तायडे, राधाबाई बोरीकर, अनकनंदा सरोदे, सत्वशिला काळे, मंगला सोनोने, नंदाबाई पूराम, सुनिता विहीरे, स्नेहा कुळमेथे, लक्ष्मीबाई थोरात यांचा जिल्हाधिकारी व मान्यरांचे हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच माजी सैनिक मेळाव्यामध्ये सैनिकांच्या नवीन स्पर्श प्रणाली पेन्शन योजना, पाल्याच्या शिक्षणासाठी शिष्यवृती व इतर अडचणी संदर्भात चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाला वीर माता, वीर पत्नी, माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी, माजी सैनिक व त्याचे परिवार तसेच एन.सी.सी. व राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी