पशुधनातील लंपी स्किन आजार घाबरण्याचे गरज नाही… पण खबरदारी आवश्यक जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे पशुपालकांना दक्षता घेण्याचे आवाहन

यवतमाळ, दि. 7 सप्टेंबर (जिमाका):- पशुधनातील लंपी स्किन आजार पसरू नये यासाठी खबरदारी घेणे आवश्यक असून या आजारामुळे जनावरे मृत्यूचे प्रमाण खुप कमी असल्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही मात्र पशुपालकांनी आजाराचे प्रमाण वाढू नये यासाठी प्रतिबंधात्मक कार्यवाही करून दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. काल नायगाव येथे एका पशुधनाला लंपी स्किन आजाराचे निदान झाल्याने सर्वांना माहिती देवून जनजागृती करण्यासाठी आज तातडीने व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे सर्व पशुसंवर्धन अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या. याप्रसंगी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे समवेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मोहन गोहत्रे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. क्रांती कोटोले व पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांनी पुढे सांगितले की लंपी स्किन रोग व त्यावरील उपाययोजनाबाबत पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी नागरिकांना तातडीने माहिती द्यावी. जनावरांमध्ये रोग आढळल्यास वेळीच त्यांना विलगीकरणात ठेवणे व लस देणे यासारख्या प्रतिबंधात्मक कार्यवाही तातडीने करून रोगाचा प्रसार थांबविण्याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. बाधीत जनावरे निरोगी जनावरांपासून वेगळी ठेवणे, त्यांना चराऊ कुरणामध्ये एकत्रित सोडण्यास मनाई करणे, डास/माश्या/ गोचिड वा तत्सम किटकांचा पशुवैद्यकाच्या सल्ल्याने औषधाचा वापर करून बंदोबस्त करणे तसेच निरोगी जनावरांच्या अंगावर किटक येवू नये म्हणून औषध लावणे व गोठ्यामध्ये औषधाची फवारणी करणे व पशुवैद्यकाच्या मार्गदर्शनानुसार लसीकरण करून घेणे आदि प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. गोहत्रे यांनी डास, चावणाऱ्या माशा, गोचिड, चिलटे, बाधीत जनावरांचा स्पर्श, दुषित चारा-पाणी यामुळे या रोगाचा प्रसार होत असल्याचे सांगितले. अंगावर 10 ते 20 मि.मी. व्यासाच्या गाठी, सुरवातीस भरपूर ताप, डोळ्यातून नाकातून चिकट स्राव, चारा पाणी खाणे कमी अथवा बंद, दुध उत्पादन कमी, काही जनावरात पायावर सूज व लंगडणे अशी या रोगाची लक्षणे असून कॅप्रीपॉक्स विषाणूमुळे या रोगाचा संसर्ग होत असल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीला पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी