विधी सेवा प्राधिकरणद्वारे “एच.आय.व्ही.” आजारावर जनजागृती शिबिर

यवतमाळ, दि. 8 सप्टेंबर (जिमाका):- राज्य विधी सेवा प्राधिकरण यांचे निर्देशावरून आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिल सुब्रमण्यम यांच्या मार्गदर्शनाखाली 7 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 2 वाजता “एच.आय.व्ही” आजाराबाबत शासकीय सामान्य रुग्णालय, यवतमाळ येथे जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिराच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्यायाधीश के.ए.नहार हे होते तर प्रमुख वक्ते म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण भोजने, पर्यवेक्षक प्रीती दास, समुपदेशक श्रीनिवास कुकडकर हे उपस्थित होते. याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण भोजने व श्रीनिवास कुकडकर यांनी एच.आय.व्ही कशामुळे होतो व त्याबाबत काय उपाययोजना आहे याबाबत विस्तृत माहिती दिली. प्रीती दास यांनी एच.आय.व्ही पिडीतांकरीता असलेल्या कायद्याबाबत माहिती दिली. एच.आय.व्ही. झालेले व्यक्तींना कायद्यानुसार विशेष अधिकार आहे तसेच विहान काळजी व आधार केंद्र, यवतमाळ या संस्थेमार्फत एच.आय.व्ही. पीडित व्यक्तींकरिता योग्य ती सुविधा उपलब्ध होऊ शकते व त्यांना कोणतीही अडचण असल्यास प्रकल्प किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ या कार्यालयास संपर्क करून योग्य ती मदत मिळू शकते याबाबत विस्तृत अशी माहिती त्यांनी दिली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव के. ए. नहार यांनी एच.आय.व्ही.ग्रस्त पीडितांना आपल्या नातेवाईकांकडून होणारा त्रास तसेच त्यांचे मुलांना सुद्धा काही कारणास्तव घराच्या बाहेर काढण्याच्या घटना घडत असतात अशा गरजू व्यक्तींकरिता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालय हे योग्य ती मोफत विधी सहाय्य व सल्ला पुरवितो त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन नीरज किनेकर, प्रकल्प समन्वयक, विहाण, काळजी व आधार केंद्र, यवतमाळ यांनी केले. सदर जनजागृती शिबिरा करिता वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी तसेच एच.आय.व्ही.ग्रस्त पीडित पुरुष व महिला यावेळी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी