कपाशीवरील गुलाबी बोंड अळीचे एकात्मिक व्यवस्थापन

यवतमाळ, दि 5 सप्टेंबर : खरीप हंगाम 2022-23 सुरू असून नुकत्याच पडलेल्या पावसामुळे पिकांना उभारी आली आहे. कपाशीचे पीक वाढीच्या व फुलपात्याच्या अवस्थेत आहे. कपाशी हे पीक पीकसंरक्षणाच्या अनुषंगाने काळजी घेऊन वेळीच कीड व रोगांचे व्यवस्थापन केल्यास पीकांचे समाधानकारक उत्पन्न मिळू शकते. कापूस पिकावरील गुलाबी बोडंअळीचे एकीकृत पणे व्यवस्थापन न केल्यास ही कीड प्रचंड पणे पिकांचे नुकसान करते यास्तव शेतकरी बांधवानी मागच्या वर्षी प्रमाणे यावर्षी जागृत राहून जाणीवपूर्वक वेळीच कपाशी वरील गुलाबी बोंड अळीचे एकात्मिक व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. त्याकरिता पुढीलप्रमाणे व्यवस्थापन करण्यात यावे. पिकांचा हंगाम डिसेंबर पर्यंत संपवून किडग्रस्त बोंडासहित पिकांचे अवशेष सेंद्रिय खतासाठी विल्हेवाट लावावी. कापूस संकलन केंद्र व जिनिंग फॅक्टरी मध्ये 15 ते 20 कामगंध सापळे जुलै ते डिसेंबर पर्यंत लावून पतंगाच्या मोठ्या प्रमाणात नायनाट करावा. हंगाम संपल्याबरोबर लगेच खोल नांगरणी करावी म्हणजे पतंगाचे जमिनीतील कोष उन्हाने किंवा पक्षाचे भक्ष होऊन नष्ट होतील. पूर्व मान्सून पेरणी शक्यतो टाळून हंगामात वेळेवर (जून ते जुलै चा 1ला आठवडा) पेरणी करावी. पानावर लव असलेल्या लवकर / मध्यम कालावधीच्या बीटी कपाशीचे वाणाची निवड करून त्यासोबत बिगर बीटी (रिफ्यूजी) चा वापर करावा. कोरडवाहू बीटी कपाशीची पेरणी चौफुलीवर करावी ( 3 × 1.5फूट किंवा जमिनीच्या मगदूरानुसार योग्य अंतर निवडावे), नत्र खताचा संतुलीत वापर करावा. कपाशीला पात्या लागण्यास सुरुवात झाल्यानंतर पिकामध्ये एकरी 2 फेरोमन सापळे याप्रमाणे लावावे, वेष्टणावरील सूचने नुसार विशिष्ट कालावधीत कॅप्सूल (ल्युर) बदलाव्या व दर आठवड्याने पतंग मोजून नष्ट करावे. कपाशीला पात्या आल्यानंतर 7 ते 8 वेळा पिकांमध्ये दर 10 दिवसानंतर ट्रायकोग्राम बॅक्ट्री या परोपजीवी मित्र कीटक असलेले ट्रायकोकार्ड एकरी 3 कार्ड याप्रमाणे लावावे म्हणजे बोंड अळ्यांचा अंडी अवस्थेत नायनाट होईल. फुलांच्या अवस्थेत दर आठवड्याने डोमकळ्या (गुलाबी बोंडअळीग्रस्त फुले) शोधून नष्ट कराव्या. फुले व प्रामुख्याने बोंड धरणाच्या अवस्थेत 5 टक्के निंबोळी अर्क किंवा शिफारशीत निम कीटकनाशके (अझाडीरेक्टीन) किंवा जैविक बुरशीनाशक (पुरेशी आद्रता असतांना) बिव्हेरीया बॅसियाना 1.15 टक्के डब्ल्यूपी 50 ग्रॅ / 10 लिटर पाणी याप्रमाणे एक फवारणी करावी. सर्वेक्षण:- पात्या व फुले अवस्थेत किमान दर आठवड्याने शेताचे प्रतिनिधित्व करतील अशी 20 झाडे निवडून त्यावरील एकूण व प्रादुर्भावग्रस्त फुले (डोमकळ्या) पात्या / बोंडे मोजून 5 ते 10 टक्के प्रादुर्भावाचे प्रमाण आढळल्यास तसेच प्राधान्याने बोंडावस्थेत 20 हिरवी बोंडे तोडून (प्रत्येक झाडावरील एक याप्रमाणे) त्यात 5 ते 10 टक्के प्रादुर्भावग्रस्त बोंडे किंवा 20 पैकी 2 बोंडात गुलाबी / पांढऱ्या अळ्या असल्यास आर्थिक नुकसान संकेत पातळी समजून रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा. मोनोक्रोटोफॉस, ट्रायझोफॉस सारखे बहुआयामी तसेच खूप विषारी कीटकनाशके कपाशीच्या सुरुवातीच्या अवस्थेत पहिले 60 दिवसात वापर करू नये त्यामुळे नैसर्गिक मित्र कीटक मारल्या जाऊन किडीचा उद्रेक होण्याची शक्यता असते. रासायनिक कीटकनाशके:- गुलाबी बोंडअळी आर्थिक नुकसान संकेत पातळी गाठल्यास रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा. त्यामध्ये क्विनॉलफॉस 25 टक्के ए एफ- 25 मिली किंवा क्लोरपायरी फॉस 20 टक्के प्रवाही 25 मिली किंवा ट्रायझोफॉस 40टक्के प्रवाही 20 मिली किंवा फेनप्रोपॅथ्रीन 10/30 टक्के प्रवाही 7.5 ते 10/2.5 ते 3.4 मिली किंवा सायपरमेथ्रीन 10 टक्के प्रवाही 7.6 मिली किंवा क्लोरॅट्रॅलीनीप्रोल 9.3 टक्के + लॅब्डासायहॅलोथ्रीन 4.6 टक्के झेड सी 5 मि.ली किंवा डेल्टामेथ्रीन 1+ ट्रायझोफॉस 35 टक्के प्रवाही 10 ते 12.5 मिली किंवा क्लोरपायरीफॉस 50 टक्के + सायपरमेथ्रीन 5 टक्के प्रवाही 10 मि.ली. (किटक नाशकांचे प्रमाण 10 लिटर पाण्यासाठी ) तरी कृपया शेतकरी बांधवानी वेळीच कपाशीवरील बोंडअळीचे एकात्मिक व्यवस्थापन करावे अधिक माहिती करिता कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कृषी विज्ञान केंद्र येथील शास्त्रज्ञ यांच्याशी संपर्क साधावा. प्रस्तुत संदेश अत्यंत महत्त्वाचा असून सातत्याने आठवड्यातून किमान तीन वेळा प्रसारित व प्रकाशित करण्यात यावा. टिप:- पायरेथ्राईड वर्गातील कीटकनाशके खबरदारी म्हणून त्याचा कपाशीचे पीक 70 ते 75 दिवसाचे झाल्यानंतरच एक किंवा दोन वेळा वापर करावा. पायरेथ्राईडच्या अधिक वापरामुळे पांढऱ्या माशीच्या प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. कीटकनाशक फवारणी करतांना विषबाधा होऊ नये यास्तव आवश्यक ती संपूर्ण खबरदारी घ्यावी. सुरुवातीच्या उपाययोजना करतांना फवारणी संरक्षण कीट वापरूनच सुरक्षित फवारणी तंत्राचा वापर करून फवारणी करावी कोणतीही जोखीम पत्करु नये जेणे करून विषबाधे पासून आपले संरक्षण होईल, असे उपविभागीय कृषी अधिकारी अमोल जोशी यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी