जिल्हा प्रशासनाचा एक दिवस बळीराजासोबत शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये .. शासन आपल्या सोबत - जिल्हाधिकारी अमोल येडगे

*विविध योजनांची माहिती देवून शेतकऱ्यांच्या जाणून घेतल्या अडचणी यवतमाळ, दि. 14 सप्टेंबर (जिमाका):- अतिवृष्टी व दुष्काळ यासारख्या नैसर्गीक आपत्ती येत राहतील, पण त्यामुळे शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. कोणत्याही संकटातून बाहेर निघण्यासाठी कुटूंबाला आपला भक्कम आधार आवश्यक आहे, आपण जगलो तर कुटूंबासाठी कोणत्याही संकटातून मार्ग काढता येईल. शासन देखील प्रत्येक संकटातून बाहेर काढण्यासाठी आपल्या सोबत आहे. त्यामुळे आत्महत्या करून आपल्या कुटूंबावरचे संकट वाढवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शेतकऱ्यांना केले. ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या शासनाच्या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांची चर्चा करून त्यांना योजनांची माहिती देणे व त्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी जिल्ह्यातील 138 गावात काल रात्रीपासून महसूल, कृषी व पशुसंवर्धन विभागचे वरिष्ठ अधिकारी बळीराजासोबत मुक्कामी होते. जिल्हाधिकारी अमोल येडगे व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर हे केळापूर तालुक्यातील सोनुर्ली या गावात, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ आर्णी तालुक्यातील लोणी येथे, अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे हे नेर तालुक्यातील उत्तरवाढोणा येथे मुक्कामी होते. जिल्हाधिकारी यावेळी मार्गदर्शन करतांना म्हणाले की, शासन-प्रशासन अतिवृष्टीमुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यासोबत आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने दुप्पट मदत केली आहे, ही नुकसान भरपाईची मदत लवकरच आपल्या खात्यात जमा होईल. यापुढेही जास्तीत जास्त योजनांचा लाभ देवून व शक्य ती मदत शेतकऱ्यांना करण्यासाठी शासन प्रयत्न करेल, निराश शेतकऱ्यांसोबत प्रशासन असल्याचा संदेश ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या अभियानातून दिल्या जात आहे. या उपक्रमांतर्गत काल सायंकाळी शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती देण्यात आली तर आज सकाळपासूनच सर्व गावातील अधिकारी यांनी स्थानिक ग्रामस्थांसह शिवार फेरी केली. शेतात भेट देवून शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकरी कशा पद्धतीने पीक घेत आहेत, काय करतात, कोणकोणत्या शासकीय योजनांची मदत त्यांना देता येईल, खरीपमधील नुकसान झाल्यानंतर सध्या राहीलेले पीक कसे टिकवायचे व त्यातून उत्पन्न कसे घ्यायचे, झालेले नुकसान रब्बी हंगामात कसे भरून काढायचे यावर चर्चा करण्यात आली. पिकविमा मिळण्यासाठी नुकसानीची पुर्वसूचना कशी द्यावी तसेच मोबाईलवर ई-पीक पाहणी नोदविणे, सुरक्षीत फवारणी आदिबाबत प्रात्याक्षीकाद्वारे शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली. मी आत्महत्या करणार नाही... अशी प्रतिज्ञा जिल्हाधिकारी व इतर अधिकारी यांनी शेतकरी बांधवांना दिली. जर बीबीएफ पद्धतीने पेरणी केल्यास नुकसान कमी झाले असते, तरी ज्या गावात बीबीएफ यंत्र उपलब्ध नाही ते त्यांनी एखाद्या योजनेतून किंवा वैयक्तीकरित्या उपलब्ध करून घ्यावे जेणेकरून पुढील आपत्तीत नुकसानीचे प्रमाण कमी राहील. पुढील वर्षीची सर्व पेरणी बीबीएफ पद्धतीने करण्याचा संकल्प करावा. तसेच शेतीक्षेत्रात पिकांची विविधता वाढवावी. फळबाग किंवा इतर पीके घेतल्यास शेतकऱ्यांना फायदा होईल. शेतात नाविण्यपुर्ण बाबी व प्रयोगशीलता आणून गावागावात प्रयोगशील शेतकरी घडावे असे जिल्हाधिकारी म्हणाले. सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित येवून शेती निविष्ठावरील आपला खर्च कमी करता येईल का तसेच नवीन शेतीपुरक उद्योग करून उत्पन्न वाढवता येईल का, याचाही विचार करावा. सध्या येणारे उत्पन्न दुप्पट तिप्पट करण्यासाठी वेगवेळे तंत्रज्ञान वापरण्याचे त्यांनी सांगितले. शेती करतांना व्यवसायाच्या स्वरूपात शेती करावी, खर्च व उत्पनाचा ताळमेळ घालावा. महिला बचत गटाला ग्रामपंचायतीमार्फत प्रोत्साहन देणे, तरूण पीढी व्यसनांच्या आहारी जाणार नाही, येणारी पीढी शिक्षीत राहावी आदि सामाजिक प्रश्नावर लक्ष ठेवण्याचे सूचना त्यांनी दिल्या. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान आहे ते देखील येणाऱ्या महिनाभरात मिळणार आहे. वेगवेगळी मदत शेतकऱ्यांना देवून शेतकऱ्यांसोबत उभे राहण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. खरीप हंगामात झालेले नुकसान रब्बीमध्ये भरून काढण्यासाठी गावस्तरावर सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित नियोजन करावे, प्रत्येकाने एकमेकांना त्यासाठी मदत करावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले. लवकरच बळीराजा समृद्धी अभियान सुरू करण्यात येणार आहे. त्यामध्ये ग्रामस्तरावरील कृषी संजीवणी समिती कार्यरत राहतील. प्रगतीशील शेतकऱी हे शेतकरी मित्र म्हणून तर अधिकारी हे शेतकरीबंधू म्हणून मार्गदर्शन करतील. शेतकऱ्यांशी सतत संवाद साधण्यात येवून आपल्या समस्यांवर पर्याय काढण्याचे काम या समित्यांमार्फत करण्यात येईल. असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. सोनुर्ली येथे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, तहसिलदार आर.आर.बीजे, गटविकास अधिकारी विठ्ठल जाधव, सरपंच तालुबाई येलके, उपसरपंच प्रमोद खरबडे, तांत्रीक कृषी अधिकारी देवानंद खांदवे, तालुका कृषी अधिकारी राकेश दाशटवार, तलाठी, ग्रामसेवक आदि प्रामुख्याने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी