पशुधनातील लंपी स्किन आजार घाबरू नका, पण खबरदारी घ्या जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे पशुपालकांना दक्षता घेण्याचे आवाहन प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्ह्यातील सर्व बैलबाजार बंद करण्याचे आदेश

यवतमाळ, दि 12 सप्टेंबर, जीमाका :- जिल्ह्यात केवळ ९ जनावरांना आतापर्यंत लंपी स्कीन आजाराची लागण झाल्याचे आढळून आले आहे, हा आजार पसरू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुद्धा करण्यात आल्या असून पशुपालकांनी या आजारासंबंधी घाबरून न जाता आवश्यक खबरदारी घ्यावी. जनावरांमध्ये कोणतेही लक्षणे आढळून आल्यास जवळच्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी आज केले आहे. लंपी स्किन आजाराचा जिल्ह्यात प्रादुर्भाव असेपर्यंत प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्ह्यातील सर्व बैलबाजार बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी आज दिलेत. जिल्ह्यात झरी- जामणी मधील मुकुटबन येथे ६, बेमाडदेवी येथे २ आणि बाभुळगाव येथे १ अशा एकूण नऊ जनावरांना लंपी आजाराची लागण झाली आहे. त्यांच्यावर औषधोपचार चालू असून या तीन गावांच्या पाच किलोमीटरच्या परिघातील गावातील जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. या आजाराला पायबंद घालण्यासाठी या आजाराची माहिती शेतकरी आणि पशुपालकांना व्हावी यासाठी ग्रामस्तरीय समित्या ॲक्टिव्ह करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. तसेच गावात आणि गोठ्यात फवारणी करावी. तालुका पशुधन अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील गावात भेट देऊन शेतकऱ्यांच्या जनावरांची तपासणी करावी तसेच या आजारासंबंधी शेतकऱ्यांना तांत्रिक माहिती द्यावी. तसेच आजाराच्या प्रसारासंबंधी तांत्रिक अभ्यास करून जनावरांवर उपचार करण्यासाठी आणि लसीकरण करण्यासाठी योग्य प्रमाणात औषधी आणि लसी मागवाव्यात अशा सूचनाही जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्यात. गोशाळेत आजाराची लागण होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी, कारण या ठिकाणी एकाही जनावराला लागण झाल्यास संपूर्ण गोशाळेतिल जनावरे बाधित होऊ शकतात. त्यामुळे या ठिकाणी विशेष काळजी घेण्याची सूचना जिल्हाधिकारी यांनी केली. जिल्ह्यात 6 लक्ष 84 हजार जनावरे असून यामध्ये एक लाख म्हैस वर्गीय आणि उर्वरित गाय वर्गीय जनावरांचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या ५ हजार लसी उपलब्ध आहेत. मात्र लसीकरण वाढविण्यासाठी 78 हजार लसींची मागणी करण्यात आली असून दोन दिवसात या लसी उपलब्ध होतिल अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. क्रांती कोटोले यांनी दिली. लंपी आजारामुळे म्हशीचा मृत्यू झाल्याची बातमी ऐकण्यात आली आहे, मात्र म्हशीचा मृत्यु लंपी आजाराच्या प्रादुर्भावामुळे झालेला नाही असे पशुसंवर्धन उपायुक्त मोहन गोहत्रे यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता जनावरांना कोणतेही लक्षण आढळून आल्यास जवळच्या सरकारी दवाखान्यात डॉक्टरांना दाखवावे असे आवाहन यावेळी पशुसंवर्धन उपायुक्त यांनी केले आहे. जिल्ह्यातील लंपी स्किन आजाराची माहिती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा जिल्हाधीकारी यांनी आज घेतला. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मोहन गोहत्रे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. क्रांती कोटोले व पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. *लंपी आजाराची लक्षणे*: अंगावर 10 ते 20 मि.मी. व्यासाच्या गाठी, सुरवातीस भरपूर ताप, डोळ्यातून नाकातून चिकट स्राव, चारा पाणी खाणे कमी अथवा बंद, दुध उत्पादन कमी, काही जनावरात पायावर सूज व लंगडणे अशी या रोगाची लक्षणे असून कॅप्रीपॉक्स विषाणूमुळे या रोगाचा संसर्ग होतो. *काय काळजी घ्यावी*: जनावरांमध्ये रोग आढळल्यास वेळीच त्यांना विलगीकरणात ठेवणे व लस द्यावी. बाधीत जनावरे निरोगी जनावरांपासून वेगळी ठेवणे, त्यांना चराऊ कुरणामध्ये एकत्रित सोडण्यास मनाई करणे, डास/माश्या/ गोचिड वा तत्सम किटकांचा पशुवैद्यकाच्या सल्याने औषधाचा वापर करून बंदोबस्त करणे तसेच निरोगी जनावरांच्या अंगावर किटक येवू नये म्हणून औषध लावणे, गोठ्यामध्ये औषधाची फवारणी करणे, व पशुवैद्यकाच्या मार्गदर्शनानुसार लसीकरण करून घेणे आदि प्रतिबंधात्मक उपाययोजना पशुपालकांनी कराव्यात.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी