हत्तीरोग नियंत्रणासाठी नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करा - जिल्हाधिकारी अमोल येडगे

राष्ट्रीय जंतनाशक दिन व हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा यवतमाळ, दि. 23 सप्टेंबर (जिमाका):- हत्तीरोग आजार व बालकांमध्ये जंतामुळे होणारे दुष्पपरिणाम आणि त्यावरील नियंत्रणाबाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या आहेत. आरोग्य विभागाच्या जिल्हास्तरीय दक्षता समितीची सभा तसेच राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा जिल्हाधिकारी यांनी काल घेतला. याप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर.डी.राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पी.एस.चव्हाण, जिल्हा माता व बाल संगोपान अधिकारी डॉ. पी.एस.ठोंबरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. तन्वीर शेख, वैद्यकीय अधिकारी डॉ. रमा बाजोरिया प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्ह्यात 10 ऑक्टोबर या जंतनाशक दिनी 1 ते 19 वयोगटातील बालकांना जंतनाशक औषधी देण्यात येणार आहे तसेच 6 ते 15 ऑक्टोबर दरम्यान जिल्ह्याच्या पुर्व भागातील यवतमाळ, कळंब, राळेगाव, घाटंजी, पांढरकवडा, मारेगाव, झरी जामणी व वणी या नऊ तालुक्यात एकदिवसीय सामुदायीक औषधोपचार मोहिमेंतर्गत हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. हत्तीरोग नियंत्रणासाठी 2 वर्षावरील सर्व लाभार्थींना 400 मि.ग्रॅम अब्लेंडॉझोल ची एक गोळी सोबत डी.ई.सी. गोळीची मात्रा 2 ते 5 वर्ष वयोगासाठी 100 मि.ग्रॅम, 6 ते 14 वयोगटासाठी 200 मि.ग्रॅम,15 ते 18 वयोगटासाठी 300 मि.ग्रॅम, व 18 वर्षावरील वयोगटासाठी 300 मि.ग्रॅम देण्यात येणार आहे. यात 0 ते 2 वर्ष बालके, गरोदर माता व गंभीर आजारी रूग्ण वगळण्यात आले आहे. राष्ट्रीय जंतनाशक दिनी 1 ते 19 वयोगटातील बालकांसाठी सर्व शासकीय व खाजगी शाळेत तसेच अंगणवाडीत व घरोघरी मुलांना अल्बेंडॉझोल या जंतनाशकाची मात्रा देण्यात येणार आहे. दोन्ही कार्यक्रम ज्या तालुक्यात राबविण्यात येणार आहे तेथे अल्बेंडॅझोलची गोळी दोन वेळा देण्यात येणार नाही याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना तसेच नागरिकांना सुरक्षीतपणे औषध कसे द्यावे याबाबत संबंधीतांना प्रशिक्षण देण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी यांनी याप्रसंगी दिल्या. कार्यक्रमाला आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी